दहा वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करून हत्या; मृतदेह पोत्यात भरून उकिरड्यात पुरला

By संदीप वानखेडे | Updated: July 24, 2024 18:00 IST2024-07-24T18:00:01+5:302024-07-24T18:00:44+5:30

आत्येभाऊच निघाला खुनी

A ten-year-old boy was kidnapped and killed | दहा वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करून हत्या; मृतदेह पोत्यात भरून उकिरड्यात पुरला

दहा वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करून हत्या; मृतदेह पोत्यात भरून उकिरड्यात पुरला

चिखली : नात्यातील दहा वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करून नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळा आवळून निर्दयपणे खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात भरून एका उकिरड्यात पुरला. कौर्याची परिसीमा गाठणारी ही घटना तालुक्यातील अंबाशी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मोहम्मद अहरान शेख हारुण (वय १०) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.

तालुक्यातील अंबाशी येथे मोहम्मद अहरान शेख हारुण हा १० वर्षीय चिमुकला २२ जुलैच्या सकाळी ९:०० वाजेपासून बेपत्ता झाला होता. अज्ञात इसमाने त्याचे अपहरण केले असावे, अशी शंका व्यक्त केली जात होती. त्यानुषंगाने मृतकाच्या वडील शेख हारुण शेख गणी यांनी चिखली पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याची गांभीर्याने दखल घेत ठाणेदार संग्राम पाटील यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून बालकाचा व अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी अंबाशीसह परिसर पिंजून काढला.

दरम्यान, मृतक अहरान हा त्याचा अंबाशी येथीलच आरोपी आत्येभाऊ शेख अन्सार शेख नासीर (वय ३०) याच्यासोबत जाताना पाहिल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली होती. त्यावरून पोलिसांनी संशयाच्या आधारे शेख अन्सार यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यानेच मोहम्मद अहरान याचे अपहरण करून त्याचा गळा आवळून खून केल्याचे समाेर आले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सदर बालकाचे प्रेत पोत्यात टाकून घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या उकिरड्यात पुरल्याचे सांगितल्यानंतर पोलिस पथक, कार्यकारी दंडाधिकारी, शासकीय पंच, फॉरेन्सिक व्हॅनसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

आरोपीने पंचांसमक्ष शेणामातीच्या उकिरड्यातून एक पोते बाहेर काढले. त्यात अरहानचे प्रेत दोरीने गळा आवळलेल्या अवस्थेत मिळून आले. दरम्यान, मृतक बालकाचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम १०३ (१), १४० (१), २३८ भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीची पोलिस कस्टडी मिळविली आहे. आरोपीने चिमुकल्याचा निर्दयीपणे खून का केला, याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही.

Web Title: A ten-year-old boy was kidnapped and killed