अल्पवयीन प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या; बुलढाणा जिल्ह्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 18:30 IST2023-04-16T18:30:00+5:302023-04-16T18:30:06+5:30
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे प्रेमीयुगुलाने जीवन संपवले आहे.

अल्पवयीन प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या; बुलढाणा जिल्ह्यातील धक्कादायक घटना
जळगाव जामोद (बुलढाणा) : तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या आदिवासी ग्राम कहूपट्टा येथील अल्पवयीन प्रेमीयुगुलाने शेतातील पळसाच्या झाडाला दोरीच्या साह्याने एकत्रितपणे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे कहूपट्टा गावासह संपूर्ण आदिवासी गावावर शोककळा पसरली.
कहूपट्टा येथील अल्पवयीन प्रेमीयुगुल आकाश पन्नालाल डाबर व प्रियंका भाईलाल मसाने या दोघांनी ध्यानसिंग मोरे यांच्या शेतातील पळसाच्या झाडाला एका दोरीच्या साह्याने लटकून आत्महत्या केली. ही बाब कहूपट्टा येथील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर एकच तारांबळ उडाली. याबाबत सुनगावचे पोलिस पाटील तडवी यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठले. याबाबत जळगाव जामोद पोलिस स्टेशनला माहिती दिली.
ठाणेदार दिनेश झांबरे यांनी त्वरित एपीआय कैलास चौधरी, पीएसआय शिवानंद किर, बीट जमादार शेगोकार, पोलिस कॉन्स्टेबल वावगे यांना घटनास्थळी रवाना केले. त्यानंतर प्रेमीयुगुलाचे मृतदेह झाडावरून खाली उतरवून पंचनामा करण्यात आला. याबाबत मृतक आकाश डावरचे काका सखाराम डावर यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या प्रेमीयुगुलाने ज्या पद्धतीने एकत्रितपणे आत्महत्या केली, त्यामुळे "एक दुजे के लिये" या चित्रपटाच्या कथानकाची अनेकांना आठवण झाली. पुढील तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहेत.