Pune Crime: फ्लॅटची कागदपत्रे चोरुन मुलाने घेतले १ कोटी २० लाखांचे कर्ज, गुन्हा दाखल
By विवेक भुसे | Updated: September 19, 2023 15:27 IST2023-09-19T15:26:29+5:302023-09-19T15:27:15+5:30
फरार झालेल्या मुलासह ॲक्सेस बँक, डीएसए एजन्सीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल...

Pune Crime: फ्लॅटची कागदपत्रे चोरुन मुलाने घेतले १ कोटी २० लाखांचे कर्ज, गुन्हा दाखल
पुणे : वडिलांच्या मालकीची फ्लॅटची कागदपत्रे चोरुन मुलाने आईवडिलांच्या खोट्या सह्या केल्या. त्याआधारे अॅक्सेस बँकेच्या अधिकार्यांशी संगनमत करुन तब्बल १ कोटी २० लाख रुपयाचे कर्ज घेतले. कर्ज घेतल्यानंतर मुलगा फरार झाला असून वडिलांनी आपल्याच मुलावर गुन्हा दाखल केला आहे.
मुकेश जयंतीलाल शहा (वय ६३, रा. सुयोग, दत्तवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिला आहे. त्यानुसार पोलिसांनी तपन मुकेश शहा (वय ३४), तत्कालीन अॅक्सेस बँकेचे अधिकारी व डी एस ए एजन्सीचे अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१८ ते २५ फेब्रुवारी २०२० दरम्यान अॅक्सेस बँकेच्या सेनापती बापट रोड शाखेत घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे किराणा भुसार दुकान आहे. त्यांचा मुलगा तपन हा त्यांच्याबरोबर काम करीत होता. त्याने घराची कागदपत्रे चोरली. वडिलांची कोणतीही परवानगी न घेता ती अॅक्सेस बँकेत कर्जासाठी दिली. फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या खोट्या सह्या केल्या. अॅक्सेस बँकेचे अधिकारी व डीएसए एजन्सीचे अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संगनमत करुन १ कोटी २० लाख रुपयांचे कर्ज घेतले. २०२० मध्ये हे कर्ज घेतल्यानंतर तपन शहा हा पळून गेला आहे. मुलगा पळून गेल्यानंतर फिर्यादी यांना या कर्जाबाबत समजले. त्यानंतर त्यांनी आता आपल्या मुलाविरोधात फसवणूकीची तक्रार दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे तपास करीत आहेत.