आधुनिक महाराष्ट्र-संत!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2018 11:27 AM2018-04-08T11:27:05+5:302018-04-08T11:27:05+5:30

महाराष्ट्राचं सरकार हे काम करणारं सरकार आहे, उगाच प्रत्येक कामाची, काम होण्याआधीच ‘मी लाभार्थी, हे माझं सरकार’ असली जाहिरातबाजी करत फिरणारं सरकार नाहीये (काय सांगता, आपल्याच सरकारच्या आहेत का त्या जाहिराती? पण, किती तुरळक दिसतात त्या जाहिराती!). त्यामुळे या प्रसिद्धीपराङ्मुख सरकारने कधीच आपल्याकडच्या संतमहंतांची जाहिरात केली नाही. आता मात्र महाराष्ट्रातल्या या आधुनिक संतांची जगाला ओळख करून देण्याची वेळ आली आहे.

Modern Maharashtra-Saint! | आधुनिक महाराष्ट्र-संत!

आधुनिक महाराष्ट्र-संत!

- मुकेश माचकर

गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश यांसारख्या शेजारी राज्यांची एकच महत्त्वाकांक्षा असते. महाराष्ट्रापेक्षा जास्त प्रगती करायची किंवा महाराष्ट्रापेक्षा प्रगत असल्याचे ढोल वाजवायचे. सध्याच्या काळात यातल्या दुसऱ्या पर्यायाला पोषक वातावरण आहे, कारण देशाने प्रत्यक्ष प्रगती करण्याऐवजी आपण पहिल्यापासून प्रगत आहोतच, आपण जे काही आहोत, तेच प्रगत असण्याचं लक्षण आहे, असे ढोल वाजवणारं एक ढोल पथकच सत्तेत आणलं आहे. औद्योगिक विकास, पायाभूत सुविधा, व्यापारउदीम यांच्यात बरोबरी साधता आली नाही की वेगळ्या काहीतरी क्लृप्त्या लढवून महाराष्ट्रावर मात करण्याचा किंवा मात केल्याचा आभास निर्माण करण्याचे प्रयत्न ही राज्यं सतत करत असतात.
मध्य प्रदेश सरकारने पाच तथाकथित संतांना राज्यमंत्रीपद देऊन असाच एक केविलवाणा प्रयत्न केला आहे. देशाला धर्माधिष्ठित राष्ट्र बनवण्याच्या प्रखर मोहिमेचा हा एक भाग आहे, अशी भलामण त्यांनी चालवली आहे. असं केल्याने ‘संतांची मांदियाळी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रापेक्षा आपण पुढे आहोत, अशी त्यांची गोड गैरसमजूत झाली असेल, तर ती मोडून काढणं हे आपलं परमकर्तव्यच आहे. 
आमच्या महाराष्ट्रात आधीपासून संतवृत्तीची, निरपेक्ष बुद्धीने काम करणारे संत विविध पदांवर विराजमान आहेत. शिवाय काही संतांच्या नेमणुकांसाठी अर्जांची छाननी सुरू आहे. विश्वास बसत नाही ना? महाराष्ट्राचं सरकार हे काम करणारं सरकार आहे, उगाच प्रत्येक कामाची, काम होण्याआधीच ‘मी लाभार्थी, हे माझं सरकार’ असली जाहिरातबाजी करत फिरणारं सरकार नाहीये (काय सांगता, आपल्याच सरकारच्या आहेत का त्या जाहिराती? पण, किती तुरळक दिसतात त्या जाहिराती!). त्यामुळे या प्रसिद्धीपराङ्मुख सरकारने कधीच आपल्याकडच्या संतमहंतांची जाहिरात केली नाही. आता मात्र महाराष्ट्रातल्या या आधुनिक संतांची जगाला ओळख करून देण्याची वेळ आली आहे.

हे आहेत आपले आधुनिक महाराष्ट्रसंत!

क्लीनचिट बाबा!
हे संत राज्यमंत्रीच नव्हे, तर कॅबिनेट मंत्र्यांपेक्षाही वरच्या दर्जाचे, सर्वोच्च दर्जाचे गणले जातात. त्यांचं परमेश्वराशी आणि परमेश्वराच्या परमशिष्याशी थेट संधान आहे. (परमेश्वर हल्ली दिल्लीत बसतो, हे तुम्हाला माहिती आहे ना?) त्यामुळे त्यांच्यावर ईश्वरी कृपेचा वरदहस्त आहे. त्यांच्याकडे कोणीही, कितीही गदळ इसम गेला तरी ते कफनीच्या खिशातून सर्फ एक्सेलचा पॅक काढावा, तशी क्लीन चिट काढतो आणि तात्काळ त्या माणसाच्या कपड्यांवरचे सगळे डाग नाहीसे होऊन तो स्वच्छ बनून जातो. त्यानंतर सीआयडी, सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स वगैरे पापग्रहांची त्या माणसाकडे वक्रदृष्टी वळवण्याची हिंमत होत नाही, असा अनुभव आहे. महाराजांच्या कफनीला दोन खिसे आहेत. दुसऱ्या खिशात काय आहे, ते गुपित आजवर कोणाला कळलेलं नाही. पण, नाठाळ माणसाला त्यांच्यासमोर उभं केलं की महाराज त्या खिशातून कागद काढून त्या माणसासमोर धरतात आणि तो कागद पाहताच नाठाळ इसम थरथर कापू लागतो असं म्हणतात. पापमार्ग सोडून (जो महाराजांचा मार्ग तो पुण्यमार्ग, त्याव्यतिरिक्तचे सगळे पापमार्ग, अशी सगळ्यात सोपी व्याख्या आहे महाराजांची) सन्मार्गाला लागण्याचं वचन दिलं, तर त्या कागदावरचा सगळा मजकूर आपोआप विरून जातो आणि मग महाराज उजव्या खिशातून क्लीनचिटचा प्रसाद देतात, असं म्हटलं जातं. 

मा अमृतस्वरानंदमयी!
या मातेला कोणत्याही सरकारी पदाचा, मंत्रीपदाचा दर्जा नाही. पण, तिचा दर्जा स्वयंसिद्ध आहे. त्यामुळे तिला या दर्जांची गरजही नाही. तिचा दबदबा त्या पदांहून मोठा आहे. ही माता नव्या युगाची गानकोकिळा म्हणून गणली जाते (हे ऐकून जंगलात कोकिळांच्या आत्महत्येचं सत्र सुरू झाल्याची बातमी खोटी आहे, खोटी आहे, खोटी आहे.) स्वरांची आराधना, हीच तिची साधना. तिच्या सुस्वर गायनाने बिल्डरांनी जमिनीखाली गाडलेल्या लुप्त नद्याही प्रकट होऊन खळखळ गायला लागतात, अवखळ झरे वाहायला लागतात, मिनिटाला लाखो रुपयांचं मानधन घेणारे अभिनेते चकटफु अभिनय करायला लागतात, असा तिचा महिमा आहे. भवतापांनी गांजलेल्या भक्तगणांवर अमृतस्वरांचा वर्षाव करून त्यांना क्लीनचिट बाबांच्या कृपेला पात्र बनवण्याचं महत्कार्यही ही माता करते, असं बोललं जातं.

टेक्स्टबुक बापू!
हे महाराज एकेकाळी खूप बोलत असत. सध्या ते बहुतेक काळ मौनसाधनामग्न असतात. यांची राज्यातल्या विद्यार्थ्यांवर विशेष कृपादृष्टी आहे. आधुनिक जगातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी विद्यार्थी सदैव सज्ज राहावेत, यासाठी हे बाबा प्रयत्नशील असतात. सतत काही ना काही बदलत राहणं, हा त्यांचा स्वभाव आहे. कारण, जग हे अनित्य आहे, याची त्यांना कल्पना आहे. कधी ही परीक्षा, कधी परीक्षाच नाही, कधी हे नियम, कधी ते नियम, कधी सुटी, कधी शाळा, असं सतत बदलतं चित्र ठेवून ते आपले अनुयायी असलेल्या विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही सजग ठेवतात. सगळ्या देशातले विद्यार्थी जेव्हा गाढ झोपलेले असतात, तेव्हाही, आता काय घडेल, ते सांगता येत नाही, आपण सज्ज राहिलं पाहिजे म्हणून, महाराष्ट्रातला विद्यार्थी आणि त्याचे आईबाप टक्क जागे असतात, ही या बाबांची मोठी कामगिरी. 

मेस्मा माता!
भगवानकृपेने पावन गडाच्या परिसरात जन्मलेली ही माता फार कडक देवीमाता म्हणून ओळखली जाते. तिने एकदा खनिजसंपन्न चिक्कीचा आहार देऊन राज्यातल्या सगळ्या अंगणवाडी विदयार्थ्यांची पचनशक्ती सुधारण्याचा चमत्कार केला होता, म्हणून तिला चिक्कीमाता या नावानेही ओळखलं जातं. तिला प्रसाद म्हणूनही चिक्की (खनिजमिश्रित नव्हे) अर्पण करण्याची पद्धत आहे. परंपरेने आलेली गादी चालवणाऱ्या या मातेला मेस्माची खूप आवड आहे. चुकल्यामाकल्या भक्तगणांना ती मेस्माची शिक्षा देते. तिच्या दरबारात हजेरी लावणाऱ्यांवर क्लीनचिट बाबांची कृपा होणं अवघड असतं, असं म्हणतात. या मातेचे स्थानही मराठवाड्यात आहे आणि भक्तगणांची संख्याही तिथेच आहे. कधीतरी ही माताच क्लीनचिट माता बनून जाईल, अशी तिच्या भक्तगणांची श्रद्धा आहे.

समृद्धी महामार्गनाथ!
मूळ नागनगरातले गडसिद्धनाथ आता इंद्रप्रस्थातून महामार्गांवर कृपादृष्टी ठेवून असतात, त्यांचा या महाराजांशी थेट संबंध नाही. ते वडीलधारे, ही धाकटी पाती. या महाराजांचे ठाणे श्रीस्थानकात आहे. त्यांना मानणाऱ्या भक्तगणांचं कल्याण होतं, अशी भक्तांची श्रद्धा आहे. रस्ते हा महाराजांच्या जिव्हाळ्याचा विषय. ते आधी ज्या मार्गाला विरोध करतात, त्याचाच नंतर प्रचार करतात, अशी त्यांची नाथाघरची उलटी खूण ओळखली जाते. मात्र एकदा त्यांचा पदस्पर्श झाला की तो मार्ग समृद्धीचा महामार्ग बनतो, अशी त्यांची ख्याती आहे. या नाथांची मूळ गादी वांद्र्यात असली तरी प्रसंगी त्या गादीपेक्षा ही गादी प्रबळ ठरते, असाही भक्तांचा अनुभव आहे. 

कार्यकारी राजीनामेश्वर!
हीसुद्धा महाराष्ट्रातली एक पदसिद्ध नसलेली, स्वयंसिद्ध गादी आहे. एकेकाळच्या या जहाल गादीचे आत्ताचे उत्तराधिकारी मवाळ महाराज म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची प्रसादाची पद्धत फार विलक्षण आहे. या महाराजांना राजीनाम्यांचा प्रसाद लागतो. म्हणजे यांचे भक्तगण खिशात राजीनामा आणि हातात मिठाई घेऊन त्यांच्या दरबारात भेटीला जातात. महाराज मिठाईचा स्वीकार करतात आणि राजीनाम्याचा मात्र अस्वीकार करतात. एखाद्या भक्तावर अवकृपा झाली तरच मिठाईबरोबरच त्याच्या राजीनाम्याचाही स्वीकार होतो. स्वीय सचिव गादी आणि संपादक गादी अशा या महाराजांच्या शिष्योत्तमांच्या गाद्याही प्रसिद्ध आहेत. महाराजांच्या अनुपस्थितीत या गाद्यांना चढवलेला प्रसादही महाराजांपर्यंत पोहोचतो, असं सांगितलं जातं.

याशिवाय महाराष्ट्रात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात दोन वेगवेगळे दादामहाराज अतिशय जागृत म्हणून प्रसिद्ध आहेत. खानदेशात प्रसिद्ध उंदीरवाले बाबा आहेत- हे हवेतून मेलेले उंदीर काढून दाखवतात. चंद्रपूरचे जंगली महाराज आकड्यांची फिरवाफिरव करून देण्याची कृपा करतात. पुण्यात क्लिपाळू महाराज हे ओशोंचा वारसा चालवून समाधीकडे नेणारे साधुपुरुष प्रसिद्ध आहेत. मुंबईत सदासंतप्त मनराज महाराजांचा बोलबाला आहे. आता सांगा मध्य प्रदेशातले ते तथाकथित संत महाराष्ट्रातल्या या संतमहंतांच्या पासंगाला तरी पुरणार आहेत का? 
याशिवाय लवकरच महाराष्ट्रात व्हॉट्सअॅप बापू, फेसबुकाचार्य, ट्विटर महंत, महामित्र महाराज, फोटोशॉप फकीर असे संत रीतसर अर्ज बोलावून नेमण्यात येणार आहेत. या सर्व माध्यमांमधून धर्मजागृतीचं कार्य निरलस भावनेने करणाऱ्या विरागी पुरुषांच्या प्रति कृतज्ञतेचा भाव दर्शवण्यासाठी त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात येणार आहे. संतांच्या या सन्मानाचा सरकारचा मनोदय समजताच अनेक बेरोजगार तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या असून सगळीकडे भगवी वस्त्रं धारण करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. विरक्तीच्या या महालाटेमुळे  राज्यात आता भगवं कापड मिळणं मुश्कील झालं आहे.
देश भगवामय करण्याची दिल्लीस्थित परमेश्वराची प्रतिज्ञा राज्यात शब्दश: पूर्ण होताना दिसते आहे.

Web Title: Modern Maharashtra-Saint!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.