शिबिरातून काँग्रेस कार्यकर्त्यांत संचारला जोम, उत्साह...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 12:23 IST2018-02-05T12:22:25+5:302018-02-05T12:23:37+5:30
विश्लेषण : काँग्रेसनं सध्याच्या परिस्थितीत खूप मेहनत घेण्याची गरज आहे. देवेंद्र फडणवीस सरकारचं जे काही यशापयश असेल ते कॉँग्रेसच्या पथ्यावर पडतंय. त्यामुळं जनमानस बदलताना दिसतंय; पण या जनमानसाचा परिपाक प्रत्यक्ष मतदानात होणं गरजेचं आहे. त्यासाठी आणखी मोट बांधत राहावी लागेल. त्या दिशेनं पडत असलेलं हे पाऊल म्हणजे या प्रशिक्षण शिबिरांकडं पाहता येईल.

शिबिरातून काँग्रेस कार्यकर्त्यांत संचारला जोम, उत्साह...
- स.सो. खंडाळकर
३० जानेवारी रोजी दिवसभर काँग्रेसजनांचं शिबीर पार पडलं. पांढरा गणवेश आणि डोईवर गांधी टोप्या घालून आलेले शिबिरार्थी बर्याच वर्षांनंतर पाहावयास मिळाले. पालघर, जळगाव आणि आता औरंगाबाद, त्यानंतर महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये अशी ही काँग्रेसची आगेकूच सुरूच राहणार आहे. कोणे एकेकाळी काँग्रेसची शिबिरं गाजत होती. मध्यंतरी मरगळ आली आणि शिबिरांची परंपरा बंद पडली. सध्या प्रशिक्षणाच्या नावाखाली भरत असलेली ही शिबिरं आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा एक भागच म्हटला पाहिजे. कार्यकर्त्यांना ‘चार्ज’ करण्याचा हा चांगला प्रयत्न वाटला. सोबतीला महिला आणि युवकांची स्वतंत्र शिबिरं होताहेत. आणखी मोटिव्हेशन वाढविल्यास काँग्रेसची म्हणून एक ताकद निर्माण होऊ शकेल. तिकीट वाटपापर्यंत व नंतरही प्रत्यक्ष लढाई लढताना ही ताकद एकसंध राहिली पाहिजे. तसं होत नसल्यानं काँग्रेस विस्कळीत होत जाते आणि त्याचा फटका बसत जातो. आतातरी यातून काँग्रेसजननांनी काही शिकावं, ही अपेक्षा आहे.
खरं तर काँग्रेसनं सध्याच्या परिस्थितीत खूप मेहनत घेण्याची गरज आहे. देवेंद्र फडणवीस सरकारचं जे काही यशापयश असेल ते कॉँग्रेसच्या पथ्यावर पडतंय. त्यामुळं जनमानस बदलताना दिसतंय; पण या जनमानसाचा परिपाक प्रत्यक्ष मतदानात होणं गरजेचं आहे. त्यासाठी आणखी मोट बांधत राहावी लागेल. त्या दिशेनं पडत असलेलं हे पाऊल म्हणजे या प्रशिक्षण शिबिरांकडं पाहता येईल. ‘हे सरकार फसणवीस सरकार होय, नरबळी घेणारं हे सरकार आहे. जनतेवर विषप्रयोग करणारं हे सरकार आहे, हे जंगलराज आहे’ अशा खास शब्दांतून निर्भीडपणे टीका करण्यास हल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण हे कुठंही कचरताना दिसत नाहीत. ही अशी आक्रमक टीका लोकांनीही आवडते. नांदेड महापालिकेची निवडणूक जिंकल्यानंतर अशोकरावांमधला आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. वाढलेला आत्मविश्वास त्यांच्या वक्तव्यांमधून प्रत्ययास येतोय. प्रशिक्षण शिबिरांची संकल्पना चांगली आहेच; पण त्याला जोडून कार्यकर्त्यांची मनोगतं ऐकून घेण्याची पद्धतही योग्यच. सध्या अशोकराव फार्मात आहेत. काँग्रेसही फार्मात येईल. त्यासाठी आवश्यकता आहे ती आणखी प्रयत्न करण्याची.
एमआयएमचं मानगुटीवर बसत चाललेलं भूत आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस कशी उचलून बाजूला फेकते, यावरही बरंच अवलंबून आहे. भाजपला पूरक वक्तव्यं व उपक्रम राबविण्यात कमीपणा मानत नाही, हे सातत्यानं दिसून येत आहे. मुस्लिम बांधवांना काँग्रेस हा चांगला पर्याय आहे.
असं मत अशोकराव चव्हाण यांनी ‘लोकमत’च्या संपादकीय सहकार्यांच्या प्रश्नोत्तरात मांडलं. ते खरंही आहे. नांदेड मनपातून एमआयएम हद्दपार करण्यात अशोकरावांना यश आलं. आता आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये अशोकराव असाच करिश्मा दाखवू शकले, तर काँग्रेसला गतवैभव प्राप्त होऊ शकेल, असं म्हणता येईल.
धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळण्यासाठी मोठा पक्ष म्हणून काँग्रेसलाच पुढाकार घ्यावा लागेल. भाजप- शिवसेनेचं भांडण हे आता नित्याचंच. इतर पक्षांना स्पेस मिळू नये यासाठी रचलेलं एक प्लॅनिंगच! हे भांडण फार गांभीर्यानं घेतोय, असं वाटत नाही. एकमेकांवर कुरघोडी करून कोण कुणाची फसगत करून घेतोय, हे काळच ठरवेल. काँग्रेसनं मागच्या चुकांमधून बोध घेण्याची गरज आहे. राजकारणातला ओबीसी फॅक्टर हा आता दुर्लक्षिण्याइतपत नगण्य नाही. त्यांच्या राखीव जागा बोगस ओबीसींच्या वाट्याला जाता कामा नयेत, याकडेही काँग्रेसनं लक्ष देण्याची गरज आहे. आंबेडकरी जनता निर्णायक असते. त्यांनाही झुकतं माप दिल्यास काँग्रेसची गणितं बघता-बघता जुळून येतील आणि अपेक्षित सत्ताबदल होईल, असं तूर्त मानायला हरकत नाही. कारण यापुढं रोजच राजकारण घडत जाणार आहे आणि त्यातून नवं समीकरण जन्मास येणार आहे. हे मात्र खरं!