कवितेतील आई शोधतोय...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 19:04 IST2018-03-17T19:01:07+5:302018-03-17T19:04:00+5:30
दिवा लावू अंधारात : वेगळ्या धाटणीचे सामाजिक काम उभे करून आपला ठसा उमटवणारा ‘मैत्र मांदियाळी’ हा जालन्यातील एक ग्रुप. अजय किंगरे आणि त्यांच्या मित्रांनी एकत्र येऊन सुरू केलेली ही एक चळवळच. अनेक रचनात्मक कामाच्या मागे उभे राहून चांगला संदेश सर्वदूर पसरविण्याचे काम हा परिवार करतो. चार वर्षांपूर्वीची गोष्ट. सामाजिक कार्यकर्त्यांचा जीवनपट लोकांसमोर घेऊन जावा या उद्देशाने या ग्रुपने जालन्यात ‘तरुणाईच्या वेगळ्या वाटा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. मंदा-प्रकाश आमटे, मी आणि मतीन भोसले आम्हा तिघांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले. प्रचंड गर्दीने भरलेल्या कार्यक्रमात आम्हा तिघांच्या मुलाखती झाल्या. कार्यक्रम उरकून मी वर्धा येथील महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमात गेलो. तेव्हा सकाळीच एक फोन आला.

कवितेतील आई शोधतोय...!
- दीपक नागरगोजे
घनसांगवीहून (जिल्हा जालना) सौ.मुळे बोलत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘रात्री तुमची मुलाखत ऐकली. डोळे भरून आले. मी एक शिक्षिका असून, पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेवर आहे. तुम्ही जशा रात्री मुलांच्या कथा सांगितल्या अगदी तशाच अवस्थेत दिवस काढणारी दोन छोटी भावंडे माझ्या शाळेत आहेत. त्यांना कुणीच नाही. मिळेल ते आणि मिळेल तेवढेच खाऊन जगतात. तुम्ही त्यांना शांतिवनमध्ये घेऊन जाल का?’ मी लगेच हो म्हटले. त्यांची माहिती मला कळवा म्हणून सांगितले. मुळे पती-पत्नी दोघेही शिक्षक. सामाजिक भान असणारे आणि ते जपणारे दाम्पत्य. त्यांनी आमची वाट पहिली नाही. या दोन मुलांना घेऊन तिसर्याच दिवशी ते शांतिवनला आले.
मुलांना प्रकल्प दाखवला आणि येथे राहाल का विचारले? मुले हो म्हणाली. कुपोषणाने सुकलेली; पण तरीही सुंदर दिसणारी ही मुले कैलास आणि विलास. कैलास तिसरीला, तर विलास पहिलीला. बोलण्यात आणि वागण्यात खूपच प्रेमळ. परिस्थिती प्रेम करायला शिकवते. मुळे गुरुजींकडून कैलास, विलासची कथा ऐकली आणि आम्ही सर्व सुन्न झालोत. इवल्याश्या आयुष्यात किती संकटांचा सामना करावा लागतो याची कल्पनाही कधी केली नसेल ते या दोघांच्या कथेतून जाणवत होते. पिंपळगावात शारदा आणि दिनकर खर्चे नावाचे पती-पत्नी नोकरीनिमित्त राहत होते. याच गावात दहा एकर जमीन घेतली. त्यांना अपत्य नसल्याने त्यांनी महेंद्र नावाचा एक मुलगा दत्तक घेतला. वाढवला. त्याचे मीना नावाच्या एका तरुण मुलीशी लग्न करून दिले. मुळातच थोडा गतिमंद असणारा महेंद्र आई-वडिलांच्या लाडात वाढला. व्यसनांच्या आहारी गेला. लग्न झाल्यावर त्याला विलास आणि कैलास ही दोन मुले झाली. पुढे वार्धक्याने दिनकर खर्चे यांचा मृत्यू झाला. शारदाबाईही मावळतीला चाललेल्या. अशा परिस्थितीत एक दिवस महेंद्रचा अपघात झाला. त्याला कायमस्वरूपी अपंगत्व आले. व्यसनांच्या आहारी गेलेला महेंद्र पुन्हा अपंगत्वाने गाठला. व्यसनाच्या आणि वाईट मित्रांची सोबत करणार्या महेंद्रने खर्चे कुटुंबाकडे असणारी सर्व शेतजमीन मातीमोल भावात विकून टाकली.
आयुष्यभर खाऊ घालणार्या काळ्या मातीची किंमत त्याला व्यसन भागावण्याइतपत मिळालेल्या पैशातच मोठी दिसली. असे म्हणतात घर फिरले, की घराचे वासे आपोआप फिरतात. इथेही तसेच झाले. आयुष्यभर पै-पै करीत ज्यांनी पैसे जमवून गाठीला ठेवले. जमीन कमावली ते दिनकरराव निघून गेले. शारदाबाई वृद्धापकाळाने घरी बसल्या. व्यसनाच्या आहारी जाऊन महेंद्रने मालमत्तेचा काटा काढला आणि पुन्हा अपघातात सापडून घरात बसला. आता संपूर्ण जबाबदारी पत्नी मीनावर आली. वृद्ध सासू, अपंग नवरा, दोन छोटी मुले हा सर्व संसाराचा गाडा हाकने तिला जिकिरीचे वाटू लागले. अडचणीत असणार्या संसारात तिचे मन रमेना. कसेबसे काही दिवस काढत तिनेही एका दुसर्या तरुणाशी घरोबा करीत पळ काढला. पळून जाताना ती मोठा मुलगा कैलास याला बरोबर घेऊन गेली होती. विलास वृद्ध आजीसोबत राहिला. शारदाबार्इंच्या सर्व परिवारावर वाईट दिवस आले. विलास आणि अपंग महेंद्रचे पोट भरवायचे कसे हे तिला सुचत नव्हते. एवढे रामायण घडूनसुद्धा महेंद्र व्यसनांना सोडत नव्हता. रांगत बाहेर जाऊन तो नशा करून यायचाच. शारदाबार्इंना हे दु:ख झेपणारे नव्हते; पण तरीही त्या जगत होत्या.
कैलास आईला सोडून परत आला कसा, या प्रश्नावर कैलासने सांगितलेली माहिती तर खूपच धक्कादायकच होती. त्याच्याच तोंडातून आम्ही ऐकू लागलो. ‘कैलासच्या मुद्यावरून मीना आणि तिचा नवीन नवरा या दोघांत सारखा वाद होऊ लागला. दोघांनी ठरवले याला कुठेतरी सोडून देऊ. सख्ख्या आईने स्वाथार्साठी केलेला हा विचार. स्व-सुखासाठी सख्खी आईसुद्धा किती वाईट असू शकते, हे पुन्हा दाखवून देणारे हे उदाहरण आहे. दोघांनी कैलासला मोटारसायकलवर घेतले आणि एका गावातून जाताना पळत्या गाडीवरून टाकून देऊन हे दोघे निघून गेले. ५ वर्षांचा कैलास जखमी अवस्थेत त्या गावातील काही लोकांना दिसला. त्यांनी त्याला दवाखान्यात नेले. त्याने दिलेल्या त्रोटक माहितीवरून त्यांनी शारदाबार्इंना शोधून काढत कैलासला तिच्या स्वाधीन केले. शारदाबाई पुन्हा दु:खी झाल्या. नियतीने परीक्षा किती घ्याव्यात याचीही सीमा असावी, असा विचार करीत स्वत:ला त्रास करून घेऊ लागल्या; पण समोर आलेली जबाबदारी पार पाडण्याशिवाय दुसरा पर्याय समोर दिसत नव्हता.
घरात खाणारी तोंडे चार आणि मिळवणारे कुणीच नाही. हक्काची जमीन गेली. सर्व आधार संपून गेले. मिळेल ते खाऊ घालत त्या लेकरांना जगवू लागल्या. शरदाबार्इंना मृत्यूची चाहूल लागली होती. कैलास, विलासला बरोबर घेत त्या स्वयंपाक करीत. त्यांनाही शिकवत आणि म्हणत की ‘तुम्ही हे शिकून घ्या... मी मेल्यावर तुम्हाला कुणी जेवायला देणार नाही. हातानेच करून खावे लागेल, म्हणून आत्ताच शिका माझ्याककडून. उपाशी मरावे नाही लागणार.’ हे ऐकताना तर आमच्या सर्वांच्याच डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या.
एक दिवस नियतीचा निर्णय मान्य करावा लागला. वृद्धापकाळाने थकलेल्या शारदाबाई सर्वांना सोडून निघून गेल्या. विलास, कैलास दुसर्यांदा अनाथ झाले. त्या लहानग्या मनावर काय परिणाम झाले असतील या सर्व घटनांचे? भूक अज्ञानी जीवाला खायचे शिकवते, तसेच विलास, कैलासचे झाले. आजीने दिलेले स्वयंपाकाचे धडे आता गिरवण्याची वेळ आली. ७ वर्षांचा कैलास चुलीवर स्वयंपाक करू लागला, तर ५ वर्षांचा चिमुकला कैलास पाणी, सरपण आणून देऊन त्याला मदत करू लागला. या लहानग्या जीवांवर अपंग बापाची जबाबदारी येऊन पडली. त्याचीही भूक भागवणे यांना क्रमप्राप्त झाले. स्वयंपाक तरी असा काय करीत होते विचारले, तर त्यांनी सांगितलेला एक-एक प्रकार संवेदनशील माणसाच्या डोळ्यात पाणी आणणारा, तर येथील व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. एका बटाट्यावर या लेकरांनी कित्येक रात्री काढल्या. शाळेत शिक्षकांचा दुपारी डबा मिळायचा. एका दिवशी विलासने मुळेबार्इंना विचारले ‘मॅडम रविवार का असतो...?’ त्या म्हणाल्या ‘एक सुटी असावी ना म्हणून...?’ त्यावर विलासनने ‘रविवारी आम्हाला उपाशी राहावे लागते... म्हणून रविवार नसावा’ हे त्या इवल्याशा जीवाने उच्चारलेले वाक्य मुळेबार्इंच्या मातृहृदयाची काय अवस्था करून गेले असेल? म्हणून तर त्यांनी शांतिवनला शोधले.
कैलास, विलासची कथा ऐकताना आम्ही सर्व सुन्न झालो होतो. त्या दोघांनाही शिक्षण आणि पालन-पोषणासाठी दत्तक घेऊन शांतिवनमध्ये ठेवायचा आम्ही निर्णय केला. दोघेही शांतिवनमध्ये आनंदाने थांबले. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटला होता. आज विलास चौथीत, तर कैलास सहावीत आहे. आनंदाने राहतात. दोघेही एकमेकांवर प्रचंड प्रेम करतात. येणार्या-जाणार्या पाहुण्यांचे आणि शांतिवनमधील प्रत्येकाचे ते आवडते आहेत. प्रत्येकाच्या काळजाला भिडणारी ही घटना आहे. ज्यादिवशी विलास, कैलास शांतिवनात आले आणि त्यांची कथा ऐकली त्यादिवशी रात्रभर मला झोप लागली नाही. मध्यरात्री कावेरी म्हणाली की ‘झोप लागत नाही? कसल्या गुंगीत आहात तुम्ही?’ मी म्हणालो ‘कवितेतील आईला शोधतोय...!’ आणि दोघेही सुन्न झालोत.
(deepshantiwan99@gmail.com)