गारपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 19:08 IST2018-03-17T19:07:49+5:302018-03-17T19:08:44+5:30

लघुकथा : कळमनुरी तालुक्यातील कामठा हे दिगंबरचं गाव. गावाला अर्धा शिवार माळरान व बाकीचा काळी शिवार. गावच्या शेताशिवारातून कॅनॉल गेला; पणिक शेतीला काही पाणी मिळत नाही. पेढे आहेत पणिक काचाला कुलूप लावलेलं. खाता येत नाही फकीत पाहा.

Hailstorm | गारपीट

गारपीट

 - महेश मोरे

दिगंबर कोल्हेने कठानाचं रान तयार केलं होतं. सोयाबीनला काहीच उतार आला नव्हता अन् पाहिजे तेवढा भाव मिळाला नव्हता. जमिनीत ओल होती. त्यानं मनाशी खूणगाठ बांधली. आता वरच्या पट्टीत गहू पेरायचा. खालच्या वावरात हरभरा पेरायचा. हरभर्‍याचं ९२१८ हे बियाणं पेरताना तो आपलं सपन पेरत होता. गहू, हरभर्‍याला चांगला उतार आल्यावर मागचा शीण जाणार होता. रानात वल असल्याने गहू, हरभरा टळटळ निघाला. गव्हाच्या पिकात तिर्र तासोट्या दिसू लागल्या. हिरव्या पिकाकडं पाहून त्याचं मन फुलून जाई. घडीभर आतून आनंद होई. दिगंबर रात्रंदिस कष्ट करणारा त्याच्या घरची माणसं बी साथ देणारी. दिगंबरची दोन मुले कष्टाळू निघाली. त्याच्या सुनापायी घरी लक्ष्मी आली. कळमनुरी तालुक्यातील कामठा हे दिगंबरचं गाव. गावाला अर्धा शिवार माळरान व बाकीचा काळी शिवार. गावच्या शेताशिवारातून कॅनॉल गेला; पणिक शेतीला काही पाणी मिळत नाही. पेढे आहेत पणिक काचाला कुलूप लावलेलं. खाता येत नाही फकीत पाहा.

दिगंबरचा हरभरा हिरवागार दिसू लागला. गहू वट्यावनी बसलेला. दिगंबर गव्हाला दारं देऊ लागला. पुढून अंगद आलेला. उभ्याउभ्याच अंगद म्हणाला, ‘लोकशेडिंगचा टाईम बदलला का?’’ दिगंबर म्हणाला, ‘तुला काईच फिकीर न्हाई. आजच दिवसा लाईन हाये. न्हाई तर रात्री भिजावावं लागते.’ अंगद म्हणाला, ‘तुह्या लईच कामाची धसकी घेतूस.’ ‘तुह्यावनी न्हाई मव्ह काम हळूच चल नंद्या आजचं होईल उद्या.’ ‘गडी कोठ गेला’ ‘त्याला बी पोट हाये. खालच्या पट्टीत जेवायला. आरं अंगद आपण काम केल्याने थोडंच मरणार. नांगरणी, ओखरणी, पेरणी आपली आपणालाच करावी लागते.’ ‘तू किती बी उत्पादन काढ अखरीला भाव ठरवणारे तेच हायेत.’ ‘मला एक कळते गड्या आपलं काम नेक असावं. तशी तर शेतकर्‍याची चवकून माती व्हायली. कोणाचे बी राज येवो पळसाला पानं तीनच.’ अंगद गावाकडं निघून गेला. दिगंबरनं दुसर्‍या वाफ्याला पाणी काढून दिलं. इतक्यात लाईन गेली. त्याचं काळीज खालीवर झालं. गव्हाला भिजवणं आवश्यक होतं. रात्री भिजवताना पाणी कोणीकडल्या कोणीकडं जाऊ लागलं. इचू किड्याचं काहीच खरं नव्हतं, तरी बी कुणबी सरपाला पाय अन् वाघाला डोस्कं लावून लढणारा.

दिगंबर शांत स्वभावाचा. त्याच्या अंगी दमदारपणा. काळ्या माईला जीव लावणारा. त्याची माय एकशेपाच वर्षांची. तिची काही जन्मतारीख न्हाई. ती खापरपंजी झालेली. दिगंबर जेवढा मातीला लळा लावतो तेवढाच जीव त्याच्या माईला लावतो. दिगंबरचा गहू डोलू लागला होता. गव्हाच्या ओंब्या झालेल्या. हरभर्‍याचा टहाळ झाला होता. कोणी जाता-येता हरभर्‍याचे फाटे उपटले तर त्यानं काही म्हणत नव्हता. हरभर्‍याचा हुळा झाला होता. हरभरा काढाय आला होता. घरचं कामकाज आटपून बाया हरभरा काढाय आल्या होत्या. एकाएकी आभाळ दाटून आलं. घोडा, कामठा, येलकीच्या शिवारात गाराचा पाऊस सुरू झाला. सगळा शिवार गारपिटीनं झोडपून काढला. हरभरा काढाय आलेल्या बायांनी झोपडी जवळ केली. गावच्या शिवारात अस्मानी संकट आलं होतं. गुरंढोरं गारपिटीनं झोडपून निघाली. पशू-पक्षी भयभीत झाली होती. किती बगळे, किती पोपट मेले, याची गणती नव्हती. किती तरी चिमण्यांचा चिवचिवाट कायमचा थांबला होता. ताटातला घास पोटात पडोस्तर भरोसा नाही तसंच झालं होतं. गारपिटीनं तिन्ही गावाला घेरलं होतं. असा सूर्यतळ पट्टा गेला होता. झाडाला पान राहिलं नव्हतं. 

सगळा शिवार बोडखा झाला होता. गहू सवान झाला होता. हरभरा मातीत मिसळला होता. तोंडचा आहार काढून घेतला होता. असं होईल कधीच वाटलं नव्हतं. कुणब्याच्या हाता-पायातलं बळ गेलं होतं. माणसं मुळासगट हादरली होती. दिगंबरच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. तो हतबल झाला होता. आधीच त्याचा एक पाय अदू होता अन् दुसरा ठणकू लागला होता. घडीभर त्याचं त्याला गर्र-गर्र फिरल्यावानी झालं. दिगंबर मटकन खालीच बसला. त्याचं सगळं अंग थंडगार पडलं होतं. 

( maheshmore1969@gmail.com )

Web Title: Hailstorm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.