my mind Just stop ! | माझिया मना... जरा थांब ना..! 
माझिया मना... जरा थांब ना..! 

- डॉ. दत्ता कोहिनकर
वीस वर्षे नामांकित कारखान्याच्या नगर रस्त्यावरील विभागामध्ये कामाला जात होतो. कारखान्यापासून १ कि.मी. अंतरावर घर, सर्व काही दिनचर्या, रुटीन छान चालले होते. विभागामधील कर्मचाऱ्यांची मुख्य विभागामध्ये बदली होणार आहे, अशी कुणकुण कानावर आली. एके दिवशी फॅक्‍टरी मॅनेजर आले व ह्यकर्मचाऱ्यांची काही कारणास्तव कोथरूडच्या मुख्य विभागामध्ये बदली करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे; ही बदली टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहेह्ण, असे सांगितले. माझ्या मनामध्ये गोंधळ उडाला, अनेक प्रकारच्या विचारांचे काहूर माजले. एकाच तासात अनेक परिचित अधिकाऱ्यांना फोन करून एकच प्रश्‍न विचारत होतो. ह्यबदली सगळ्यांचीच करणार काय?ह्ण मन उदास झाले होते. अधिकाऱ्यांच्या उत्तराची वाट पाहताना माझे मन फारच घाई-गडबड करत होते. मनातील विचारांकडे साक्षीभावाने पाहताना ओठातून एक गाणे बाहेर पडले, ह्यह्यये बेकरारी क्‍यूं हो रही है । ये जानता ही नही... दिल है के मानता नही.ह्णह्ण गौतम बुद्धांनी म्हटल्याप्रमाणे प्रिय स्थितीचा वियोग हे दुःखाचे कारण- अनुभूतीवर उतरले. मनाला व शरीराला एका विशिष्ट गोष्टीची सवय झाली की त्याचा त्याग करणे व बदल स्वीकारणे त्याला मान्य नसते. अमेरिकेत २० वर्षांच्या एका तरुणाला खुनाच्या आरोपाखाली ५० वर्षांची शिक्षा झाली. त्याचे तुरुंगातील वर्तन इतके चांगले होते, की निम्मी शिक्षा माफ करून २५ वर्षानंतर त्याला सोडून देण्यात आले. तो बाहेर पडला. त्या वेळचे जग वेगळे होते. भाषा बदलली होती. परिवारातील कोणीही उरले नव्हते. आई-वडिलांचा मृत्यू झाला होता. जगरहाटी बदलली होती. धावणाऱ्या गाड्या, गर्दीचे रस्ते, निराधारता, गोंगाट या सर्व गोष्टींनी तो भयभीत झाला व परत तुरुंगाधिकाऱ्याला भेटून ह्यमला इथेच ठेवाह्ण, अशी विनवणी करू लागला. तुरुंगाच्या भिंतीशेजारील मोकळ्या जागेत तो रात्री झोपायचा व दिवसभर खुल्या कारागृहाच्या शेतात काम करायचा. तेथे त्याला भोजन मिळत असे. कालांतराने त्याच्यासाठी कोठडीचीही व्यवस्था करण्यात आली. मरेपर्यंत तो त्या तुरुंगाच्या परिघाबाहेर गेला नाही. आपले मनदेखील असेच तुरुंग निर्माण करून त्यात राहू इच्छिते. त्याठिकाणी आपल्याला पीडा, त्रास, दुःख झाले, तरी आपण बदल स्वीकारायला तयार नसतो. गदिमांनी म्हटल्याप्रमाणे जग हे बंदिशाळा- जो तो येथे पथ चुकलेला हा मनाचा स्वभाव बदलायचा कसा? कारण निसर्गात प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील आहे. 
रस्ता चुकलेले कोळी व त्यांच्या बायकांची रात्री एका चांगल्या प्रशस्त बंगल्यामध्ये झोपायची व्यवस्था लोकांनी केली. पण त्यांना रात्रभर झोपच आली नाही कारण मासे ठेवणाऱ्या टोकऱ्याचा उग्र दर्प तेथे अजिबात नव्हता. विवेकानंद म्हणतात, ह्यह्यहे परमेश्‍वरा, या जगात मी जे बदलू शकतो ते बदलण्याची ताकद मला दे, जे मी बदलू शकत नाही त्याबरोबर जुळवून घेण्याची कुवत मला दे व मी काय बदलू शकतो व काय बदलू शकत नाही हे समजण्याचे शहाणपण देवा मला दे। हे साध्य करण्यासाठी मनाचा व्यायाम करणे गरजेचे आहे.

Web Title: my mind Just stop !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.