Work on the Tiroda-Katangi Railway is incomplete | तिरोडा-कटंगी रेल्वे मार्गाचे काम अपूर्णच
तिरोडा-कटंगी रेल्वे मार्गाचे काम अपूर्णच

ठळक मुद्देसात दशकांपासून मागणी : उत्तर भारतात जाणारा जवळचा मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तिरोडी ते कटंगी या रेल्वे मार्गाचे बांधकाम गत सात दशकांपासून अपूर्ण आहे. केवळ १५.९ किमीचा ट्रॅक पूर्णत्वास आला तर उत्तर भारतात जाण्यासाठी जवळचा आणि सोईचा मार्ग ठरणार आहे. गत दोन वर्षांपासून सुरु असलेले काम अतिशय संथगतीने सुरु आहे.
इंग्रजांच्या काळात रेल्वे मार्गाचे मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले. तिरोडीपर्यंत रेल्वेचे कामही झाले. त्यानंतर उत्तर भारताशी जोडणाऱ्या कटंगी मार्गाची मागणी पुढे येवू लागली. दरम्यान रेल्वे मंत्रालयाने तिरोडी ते कटंगी रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली. १३ जून २०११ तत्कालीन केंद्रीय शहरी विकास मंत्री कमलनाथ यांच्या हस्ते या मार्गाचा शिलान्यास करण्यात आला. त्यानंतर काम पुन्हा रखडले. ५ ऑक्टोबर २०१८ रोजी रेल्वे ट्रॅकच्या बांधकामाचे पुन्हा भूमिपुजन खासदार बोधसिंग भगत यांच्याहस्ते करण्यात आले. दोन वर्षात हा रेल्वे मार्ग पुर्ण होईल असे सांगण्यात आले. परंतु बांधकामाची गती संत असल्याने २०२० पर्यंत काम पूर्ण होण्याची कोणतेही चिन्हे दिसत नाही.
तिरोडी ते कटंगी रेल्वे मार्गाचे अंतर १५.९ किमी आहे. यासाठी १८६ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ६९.३८ हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात आली. या मार्गावर सहा मोठे पुल, २४ लहान पुल, १३ रस्त्यावरील पुल बांधण्यात येणार आहे. पोनिया या रल्वे स्थानकावर नव्याने बांधकाम केले जाणार आहे.

नागपूर-कटंगी-जबलपूर मार्ग
तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे बांधकाम पुर्ण झाल्यावर नागपूर - कटंगी - जबलपूर असा रेल्वे मार्ग निर्माण होणार आहे. त्यामुळे उत्तर व दक्षिण भारतात जाणाºया प्रमुख रेल्वे मार्ग उपलब्ध होणार आहे. कटंगी- बालाघाट- जबलपूर हा रेल्वे पुर्वीपासून अस्तित्वात आहे. केवळ तिरोडी-कटंगी रेल्वेचे काम तेवढे रखडले आहे. तुमसर रोड ते तिरोडीचे अंतर ४६.८३ किमी आहे. यात सात रेल्वेस्थानक आहे. याकरिता रेल्वेगाडीला एक तास २० मिनिटे लागतात. नवीन रेल्वेमार्गामुळे मध्यप्रदेशासोबत व्यापार, शिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

Web Title: Work on the Tiroda-Katangi Railway is incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.