जिल्ह्यात वन्यजीव-मानवी संघर्ष वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2022 05:00 IST2022-04-06T05:00:00+5:302022-04-06T05:00:38+5:30
भंडारा जिल्ह्यात ९३१.२४ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. घनदाट जंगलात वाघ, बिबटे, रानडुक्कर यांसारख्या हिंस्र प्राण्यांसह तृणभक्षी प्राणी आहेत. गत अनेक वर्षांपासून वन्यजीव आणि मानवी संघर्ष होत आहे. परंतु अलीकडच्या काळात या घटनांत वाढ झाल्याचे दिसून येते. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे जंगलामध्ये मानवाचा संचार वाढल्याचे दिसते. जिल्ह्यात कुठेही एखाद्या गावात वन्यप्राण्याने शिरून कुणावर हल्ला केल्याच्या घटना घडल्या नाहीत.

जिल्ह्यात वन्यजीव-मानवी संघर्ष वाढला
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : घनदाट जंगलाची निसर्गदत्त देणगी लाभलेल्या भंडारा जिल्ह्यात अलीकडच्या काळात वन्यजीव मानवी संघर्ष वाढल्याचे दिसून येत आहे. वन्यजीवांच्या हल्ल्यात अनेकांचा बळी गेला, तर वाघ, बिबटे, निलगाय, रानडुकरांच्या शिकारीच्या घटनाही पुढे आल्या. बहुतांश घटना जंगलात घडल्या असून, गावात शिरून कोणत्याही वन्यप्राण्याने अद्यापपर्यंत तरी हल्ला केला नाही. मात्र हल्ल्याची एखादी घटना घडली की वन्यजीवाला दोषी ठरवून त्यांच्याच बंदोबस्ताची मागणी केली जाते.
भंडारा जिल्ह्यात ९३१.२४ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. घनदाट जंगलात वाघ, बिबटे, रानडुक्कर यांसारख्या हिंस्र प्राण्यांसह तृणभक्षी प्राणी आहेत. गत अनेक वर्षांपासून वन्यजीव आणि मानवी संघर्ष होत आहे. परंतु अलीकडच्या काळात या घटनांत वाढ झाल्याचे दिसून येते. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे जंगलामध्ये मानवाचा संचार वाढल्याचे दिसते. जिल्ह्यात कुठेही एखाद्या गावात वन्यप्राण्याने शिरून कुणावर हल्ला केल्याच्या घटना घडल्या नाहीत. तीन महिन्यात वाघाच्या हल्ल्यात दोघांचा बळी गेला, तर रानडुकराच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत.
फेब्रुवारी महिन्यात लाखांदूर तालुक्यातील दहेगाव येथे सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या एका इसमावर वाघाने हल्ला करून ठार मारले होते, तर मंगळवार ५ एप्रिल रोजी इंदोरा जंगलात मोहफूल संकलनासाठी गेलेल्या इसमाला वाघाने ठार केले. या दोन्ही घटना जंगलात घडल्या आहेत. वनविभाग वारंवार जनजागृती करून नागरिकांना जंगलात जाण्यापासून परावृत्त करतात.
मात्र अनेक जण जीव धोक्यात घालून जंगलात जातात. हल्ला झाला की वन्यप्राण्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांच्या बंदोबस्ताची मागणी केली जाते.
शिकारीच्या घटनात वाढ
- वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्याच्या घटनांसोबतच वर्षभरात सहा वाघ, चार बिबटे आणि निलगाय, रानडुकराच्या शिकारीच्या घटना घडल्या आहेत. वन्यजीव मानव संघर्ष टाळण्यासाठी आता मानवानेच संयम बाळगून जंगलाला सुरक्षित ठेवण्यासाठी जंगलातील संचार कमी करणे गरजेचे आहे. वनविभागाच्यावतीने जनजागृती केली जात असली तरी नागरिकांचा मात्र फारसा प्रतिसाद मिळत नाही. मोहफूल संकलन करण्यासाठी अनेक जण जंगलात जातात. मात्र सुरक्षेच्या कोणत्याही उपाय योजना केल्या जात नाही. त्यामुळे हल्ल्याच्या घटना वाढत आहे.
मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती केली जात आहे. वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सभा घेतल्या जातात. एखादी घटना घडली तर परिसरातील गावात दवंडी देऊन जंगलात न जाण्याची सूचना केली जाते.
- राहुल गवई, उपवनसंरक्षक भंडारा