जीवघेणा भेसळीचा खेळ कधी थांबणार?
By Admin | Updated: November 10, 2014 22:38 IST2014-11-10T22:38:28+5:302014-11-10T22:38:28+5:30
दूध असो किंवा दही, तेल असो किंवा तूप, पेट्रोल असो वा डिझेल, खवा असो वा रवा, फळे असो वा खाद्य पदार्थ, सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेली अशी एकही वस्तू नाही

जीवघेणा भेसळीचा खेळ कधी थांबणार?
भंडारा : दूध असो किंवा दही, तेल असो किंवा तूप, पेट्रोल असो वा डिझेल, खवा असो वा रवा, फळे असो वा खाद्य पदार्थ, सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेली अशी एकही वस्तू नाही जी भेसळीपासून मुक्त आहे. यापासून होणारे आजार दिवसेंदिवस वाढतच असताना प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले असल्याने भेसळ नव्हे विषच असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे.
सकाळी घरी येणारे किंवा खरेदी करून आणलेले दूधही शुद्ध असेल याची हमी नाही. आजारपणाच्या काळात बाजारातून आणलेली फळेही रासायनिक पदार्थाचा वापर करून पिकवली जात असल्याने ती खाण्यास योग्य नाही, पेट्रोलमध्ये पाणी मिसळवले जात असल्याने वाहने नादुरुस्त होत आहेत. डिझेलमध्ये रॉकेलची सर्रास भेसळ केली जात असून त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. खाद्य तेलाच्याबाबतीतही भेसळ नवी नाही. हॉटेल्स, खानावळीच नव्हे तर मोठ्या हॉटेल्समधील खाद्य पदार्थात भेसळ नसेल असा दावा आज कुणीही करू शकत नाही.
मिठाईची वाढती मागणी लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त मिठाईंची विक्री केली जाते. अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त खवा जप्त केला होता. मिठाईसाठी वापरण्यात येणाऱ्या खव्यातच भेसळ केली जात असल्याने अनेक वेळा अशी मिठाई खाऊन लहान मुलांना पोटाचे विकार झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात 'फास्ट फूड'कडे तरुणाई आणि लहान मुलांचा कल वाढला आहे.
शहरातील विविध भागात असलेली छोटी हॉटेल्स, खानावळी यांची नियमित तपासणी होत नाही.
दूध - दूधाचा थेंब तिरप्या गुळगुळीत पट्टीवर टाकल्यास तो झटकन घरंगळेल व पांढरा ओघळ दिसणार नाही. जर दूध शुद्ध असेल तर त्याचा थेंब तेथेच थांबेल अथवा पांढरा ओघळ खाली येईल. दूधात थोडे आयोडिनचे द्रावण टाकल्यानंतर निळा रंग आल्यास त्यामध्ये स्टार्च (पिठूळ पदार्थ) मिसळलेले आहेत, असे समजावे. बाकी भेसळीच्या पदार्थांच्या चाचण्या प्रयोगशाळेमध्ये करता येतात. स्वास्थ्यासाठी दूध तापवूनच पिणे अत्यावश्यक आहे.
खवा - रताळे, शिंगाडा पीठ, वनस्पती तुपाची खव्यात भेसळ केली जाते. खवा हातावर घेऊन रगडल्यास हाताला चिकटून घाण वास येतो. भेसळ असलेला खवा खाल्ल्यास तो टाळूला चिकटतो. भेसळ असलेल्या खव्यात आयोडिनयुक्त पाणी टाकल्यावर जांभळा रंग येतो.
तूप - पातळ केलेल्या एक चमचा तुपात किंवा लोण्यात पाच थेंब तीव्र हायड्रोक्लोरिक अॅसिड व अर्धा चमचा साखर टाकल्यास दोन थर तयार होतात. आम्लाचा थर दहा मिनिटात लालसर झाल्यास त्यात भेसळ झाल्याचे ओळखावे. लोणी, दही किंवा पिठाची भेसळ ओळखण्यासाठी त्यावर टिंचर आयोडिनचे पाच थेंब टाकावेत. जांभळा रंग आल्यास भेसळ असल्याचे समजावे.
मिठाई - थोडी मिठाई घेऊन त्यावर तीव्र हायड्रोक्लोरिक आम्ल टाका जांभळा रंग आल्यास मिठाईत मेटॅनील रंग असल्याचे सिद्ध होते.
मिरची पावडर - मिरची पावडरमध्ये रंगवलेल्या लाकडाचा भुसा, विटांची भुकटी किंवा टॅल्कम पावडर असते. ही मिरची पूड जाळून राख करावी. प्रमाणापेक्षा जास्त राख असल्यास भेसळ समोर येते.
पिठीसाखर - पिठीसाखरेत हायड्रोक्लोरिक आम्ल टाकल्यास धुण्याचा सोडा किंवा खाण्याचा सोडा टाकलेला असेल तर फेस दिसून येईल.
हळद पावडर - थोडी हळद पावडर पाण्यात टाकावी, त्यात हायड्रोक्लोरिक अँसिड टाकल्यास लाल रंग येतो. हा रंग काही वेळानंतरही न गेल्यास त्यात मेटॅनील येलोची भेसळ असते. या खाद्यपदार्थातही होते भेसळ
शहरातील काही तूप विक्रेते तुपामध्ये वनस्पती तेलाची भेसळ करतात व जास्त नफा मिळवतात. बेसन आणि रवा हा कमी दजार्चा वापरला जातो. चहामध्ये लाकडाचा भुसा, रंगीत पावडर, तांदळात पांढरे खडे, बासमतीमध्ये स्वस्त तांदूळ मिसळणे, मिरची पावडरमध्ये विट भुकटी. हळद पावडरमध्ये मेटॅनील येलो रंग, मिऱ्यामध्ये पपईच्या बियांची सर्रास भेसळ होते. (शहर प्रतिनिधी)