We finish ours, you don't come ...! | आम्ही आमचे उरकून घेतो, तुम्ही येऊ नका...!

आम्ही आमचे उरकून घेतो, तुम्ही येऊ नका...!

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या झळा : अनेकांनी बांधल्या रेशीमगाठी

राजू बांते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : आमच्या मंगलकार्यास सहकुटुंब अगत्य येण्याचे करावे अशी विनंती विवाह निमंत्रण पत्रिकेत छापली जाते. पण, आता लग्न घराची मंडळी आपल्या आप्तेष्टांना ‘आम्ही थोडक्यात लग्न उरकून घेतो. तुम्ही लग्नाला येऊच नका’ अशी विनंती केली वर- वधू पक्षाकडून केली जात आहे.
सध्या कोरोनाच्या झळा अधिक तीव्र होत आहेत. या तपत्या झळेत कोरोना विषाणू मरेल ही आशा मावळली आहे. लॉकडाउन वाढताच आहे. किती दिवस लग्न रोखून धरायचं म्हणून गावागावात 'सावधान' राहून लग्न विधी उरकले जात आहेत. ग्रामीण भागातील लग्न बहुधा मार्च, जूनपर्यंत चालत असतात. पण, मार्च महिन्यातच कोरोना विषाणू येवून धडकला. तो थांबता थांबेना. इकडे दोन परिवारातील नात्यांना एकत्र करण्यासाठी लग्नगाठ बांधायची तयारी करून घेतली होती . अखेर त्या दोन जीवांच नातं अधिक दृढ करण्यासाठी पुढे पाऊल घातले गेले. सहनशीलतेचा बांध फुटायला लागला. अन खेड्यात लग्नाचे बार उडायला सुरुवात झाली. ८ मे पासून मोहाडी येथील प्रशासनाने लग्न कार्य करण्याची परवानगी देण्यास सुरवात केली .
प्रशासनाच्या अटीचे पालन करून अगदी सावधगिरीने अती सामान्यपणे लग्न विधी उरकून घेतली जात आहे. कमी लोकांत लग्न कसा आटोपून घेतला जाईल याची काळजी घेतली जात आहे. कोरोनाची तापाचा परिणाम लग्न कार्यावर झाला आहे. आत्याच्या लग्नाला यायचं हं... असं नातेवाईकांना आवार्जून सांगणारे आप्त आता आम्ही आमचे उरकून घेतो तुम्ही लग्नाला येऊ नका, असा आग्रह केला जात आहे. लग्नाला बोलावलं नाही म्हणून रुसवे- फुगवे कोरोनाने हिसकावून घेतले आहे. इच्छा असूनही आप्तेष्टांना दूर ठेवावे लागत आहे . मात्र आप्तांची दिलगिरी व्यक्त केली जात आहे. आप्तही अडचण समजून घेत आहेत.त्यामुळे
मानपानाचा सोपस्कार विसरून आप्त फेसबुक, वाट्सएप आदी माध्यमातून आशीर्वाद देवू लागली आहेत. खेड्यात लग्न बहुधा रात्री होत. आता गावात पहाटे लग्न आटोपल्याची बातम्या आहेत. सकाळी नऊच्या आत झटपट लग्न सोहळे होत असतानाचे चित्र गावागावात दिसून येत आहेत. डीजेच्या ताल अन त्यावर थिरकणारी तरुणाई लग्नातला जल्लोष कुठेच दिसून येत नाही. जेवणाच्या रांगा पडत नाही. फार तर लग्नात पंचवीस-पन्नास लोकांमध्ये लग्न कार्य आटोपून घेत आहेत. लग्नात जास्त गर्दी म्हणजे रुबाब अन प्रतिष्ठा मोजली जात होती. आयुष्यभर लग्नाचा तोरा मिरवायचा पण या सर्व बाबींना सोयीस्करपणे फाटा दिला जात आहे. ही सर्व कोरोनाने बदल घडविले आहेत. तसेच, कोरोनाने विपरीत परिस्थितीत कसे जुळवून घ्यावे हे सांगितले आहे. शेतकरी कजार्चा ओझा सोसत, दु:ख सहन करत लेकरांच्या लग्नाची हौस फिटवत असे. पण, आज कजार्चा भार डोक्यावर घेऊ नका. कमी लोकांत, कमी खर्चातही छान लग्न पार पडू शकतात अश्या प्रतिक्रिया ग्रामीण भागात कानावर पडत आहे.

१४ मे नंतर ४६१ लग्नसोहळ्याला परवानगी
मोहाडी तालुक्यात ८ ते १३ मे पर्यंत तहसीलदार यांचेकडून २५४ लग्न कार्याची परवानगी घेण्यात आली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मोहाडी व तुमसर तालुक्यात १४ मे नंतर ४६१ लग्नसोहळे करण्याची परवानगी देण्यात आली. तर गावात अनेक लग्न परवानगीविना पार पडले आहेत.

Web Title: We finish ours, you don't come ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.