लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : डेल्टा व ओमायक्रॉन विषाणुची रोखथाम करीत असतानाच डेल्मीक्रॉननेही अन्य देशात धडक दिली आहे. त्यामुळे सध्या ओमायक्रॉन रोखायचे असेल तर ज्यांनी आतापर्यंत लसीचा एकही डोस घेतला नाही त्यांनी लस घेणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. उल्लेखनीय म्हणजे ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार असून जिल्ह्यातील दीड लक्ष ज्येष्ठ नागरिकांनाही बुस्टर डोस देण्यात येणार आहे.जिल्ह्यात आतापर्यंत १५ लक्ष ७४ हजार २९३ व्यक्तींनी लस घेतली आहे. यापैकी पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या आठ लक्ष ७४ हजार ६५६ आहे. तर दुसरा डोस सहा लक्ष ९९ हजार ६३७ जणांनी घेतला आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत दिवसभरात दहा हजार ६४१ व्यक्तींनी १६३ केंद्रांमधून डोस घेतला. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर बुस्टर डोस घेण्यासोबतच आतापर्यंत एकही डोस न घेतलेल्यांनी आवर्जून प्रथम लस घेणे गरजेचे झाले आहे.
दीड लक्ष ज्येष्ठांना मिळणार बूस्टर- जिल्ह्यात आतापर्यंत ६० वयोवर्षावरील दोन लक्ष ९७ हजार १८६ ज्येष्ठ नागरिकांनी डोस घेतले आहे. तसेच ४५ ते ६० या वयोगटातील चार लक्ष १३ हजार २६४ नागरिकांनी लसीकरण केले आहे. त्यामुळे आता नवीन वर्षात जिल्हाभरातील जवळपास दीड लक्ष नागरिकांना बुस्टर डोस देण्यासंदर्भात तयारी आरोग्य प्रशासनाने केली आहे.
१० हजार हेल्थ केअर वर्करना मिळणार बूस्टर- कोरोना महामारीत अनन्यसाधारण भूमिका वठविणाऱ्या जिल्हाभरातील हेल्थकेअर वर्कर्सना लसीकरणाचा बुस्टर डोस देण्यात येणार आहे. ११ हजार २४ हेल्थ केअर वर्करनी पहिला डोस तर दुसरा डोस दहा हजार ८७१ जणांनी घेतला आहे. जिल्ह्यात आगामी काळात दहा हजार पेक्षा जास्त हेल्थ केअर वर्कर्सना बुस्टर डोस देण्याचे उद्दिष्ट आहे.
लस घेणे महत्वाचे
कोरोना महामारीवर लस घेणे हाच एकमेव उपाय आहे. याशिवाय मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. ओमायक्रॉनचा एकही रुग्ण जिल्ह्यात नाही. मात्र दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ज्यांनी आजपर्यंत एकही लस घेतली नाही त्यांनी कोविड लस घ्यावी. -डॉ. प्रशांत उईके, जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा
१५ ते १८ वयोगटातील ५५ हजार ७५५ जणांना देणार लस
- केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील अनुमानित ५५ हजार ७५५ मुलांना कोविड लस देण्यासंदर्भात जिल्हा आरोग्य प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. यासाठी विविध दिशा निर्देशही आरोग्य विभागाच्यावतीने जारी करण्यात आले आहे.