वणव्यामुळे कोट्यवधींचे वृक्ष नष्ट; वनविभागाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:35 IST2019-04-28T00:34:54+5:302019-04-28T00:35:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : अलीकडे उन्हाळा लागला की, धुरे, रस्त्याच्या कडेचे शुष्क गवत पेटविण्याचा मोसम सर्वत्र नजरेत पडतो. ...

वणव्यामुळे कोट्यवधींचे वृक्ष नष्ट; वनविभागाचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अलीकडे उन्हाळा लागला की, धुरे, रस्त्याच्या कडेचे शुष्क गवत पेटविण्याचा मोसम सर्वत्र नजरेत पडतो. मात्र या पेटवापेटवीत शेकडो जिवंत बहरलेली झाडे तसेच शासनाने अमाप खर्च करून लावलेली रोपे मरतात, याची कुणालाही फिकीर नाही. विशेष म्हणजे, आगीमुळे उन्मळून पडलेल्या झाडांच्या लाकडाची सर्वांदेखत वाहतूक होत असतानाही शासकीय विभाग त्याबाबत जाब विचारत असल्याचे चित्र कुठेच नाही.
एकीकडे शासन झाडे लावण्यासाठी अमाप पैसा खर्च करीत आहे. दुसरीकडे दिवसाढवळ्या रस्त्याने लावलेल्या आगीत उभी झाडे पेटविली जात आहेत. शेतातील धुऱ्याचे गवत पेटविण्यासाठी तसेच नदी-नाल्याकाठी सफाईच्या नावावर शेतकरी आगी लावतात. ती आग झाडांना कवेत घेते आणि अखेर झाडे कोसळतात. विशेष म्हणजे, आगीच्या नोंदीची जबाबदारी तलाठ्यांकडे असताना, त्यांचे त्याकडे लक्षच नाही. नेमून दिलेल्या ठिकाणी भेट दिली, की वास्तव्याच्या ठिकाणी निघून जाण्यात ते धन्यता मानतात. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली आहे.
राज्य शासनाने वृक्षारोपण योजनेकरिता अमाप खर्च केला. रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण केले. ती झाडे जगविण्याकरिता बचतगटांना उद्युक्त केले. मात्र, रस्त्याच्या कडेला लावलेल्या आगीमुळे वृक्षारोपण योजनेचा फज्जा उडाला आहे. शेतातील वा रस्त्यालगतची झाडे तोडून जिल्ह्यातील लाकडे वाहून नेली जात आहेत.