अवकाळी पावसाचा फटका, १६ हजार ३१७ हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांच्या नुकसानीची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 17:54 IST2021-12-30T15:21:15+5:302021-12-30T17:54:54+5:30
झालेल्या अवकाळी पावसामुळे लाखांदूर तालुक्यातील १६ हजार ३१७.४० हेक्टर क्षेत्रातील विविध रब्बी पिकांचे नुकसान होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अवकाळी पावसाचा फटका, १६ हजार ३१७ हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांच्या नुकसानीची शक्यता
लाखांदूर : यंदाच्या रब्बी हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकूण १६ हजार ३१७.४० हेक्टर क्षेत्रात विविध रब्बी पिकांची लागवड केली आहे. मात्र दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण असल्याने व २८ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास अवकाळी पाऊस पडल्याने तालुक्यातील १६ हजार ३१७.४० हेक्टर क्षेत्रातील विविध रब्बी पिकांचे नुकसान होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यंदाच्या रब्बी हंगामात तालुक्यात एकूण १३ हजार २०५ हेक्टर क्षेत्रात विविध कडधान्य पिकांची लागवड करण्यात आली आहे. या पिकांत लाखोरी, हरभरा, उडद, मूग, वाटाणा, पोपट व बरबटी आदी कडधान्य पिकांचा समावेश आहे. तथापि, लागवडीखालील पिके येत्या काही महिन्यांत कापणीयोग्य होण्याची शक्यता आहे. दरम्यान, तालुक्यात २८ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी अंतर्गत लागवड करण्यात आलेल्या कडधान्य पिकांना सर्वाधिक नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांत दिसून येत आहे.
यंदाच्या रब्बी हंगामात अन्य पिकांतर्गत गहू, मका, जवस, मोहरी, सोयाबीन, करडई व भाजीपाला पिके यांसह अन्य विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. ही पिके तालुक्यातील एकूण ३०७७.६० हेक्टर क्षेत्रात लावण्यात आली आहेत. मात्र २८ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी अंतर्गत लागवडीखालील पिकांवरदेखील संकट ओढावल्याचे दिसून येत आहे.
यंदाच्या खरिपात तालुक्यातील जवळपास २ हजार ३०० हेक्टर क्षेत्रात तूर पिकाची लागवड करण्यात आली आहे. तथापि, लागवडीखालील तूर पिकाला कापणीसाठी काही दिवस शिल्लक असतांनाच तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. त्यामुळे हातात आलेल्या तूर पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांत व्यक्त केली जात आहे.