लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भंडारा-तुमसर राष्ट्रीय महामार्ग हा जिल्ह्याच्या दळणवळणाचा मुख्य कणा मानला जातो. परंतु गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यावर खड्डे ठिकठिकाणी पडले असून त्यांचे मृत्यूचे खड्डे म्हणून ओळख होत आहे. रामटेक गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी उड्डाणपूल खड्यांमुळे अक्षरशः धोकादायक ठरला आहे. जागतिक बँकेच्या मदतीने कोट्यवधींचा खर्च करून उभारण्यात आलेला हा पूल, दुर्लक्ष व निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संकट बनला आहे.
उड्डाणपुलाच्या डांबरीकरणाची पुटकुळी निघून खड्डे निर्माण झाले असून त्यावर माती मिश्रित रेती टाकून तात्पुरती लपवाछपवी केली जात आहे. यामुळे पावसाळ्यात ही रेती व माती रस्त्यावर साचून वाहनचालकांचे नियंत्रण सुटण्याची शक्यता वाढते. विशेषतः दुचाकीस्वार व प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे.
पथदिवे सुरू होण्याची प्रतीक्षा कायम !दोन महिन्यांपूर्वी उड्डाणपुलावरील पथदिवे बसविण्यात आले, मात्र ते अद्याप कार्यान्वित झालेले नाहीत. रात्रीच्या वेळी या पुलावर अंधार असतो. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना धोका अधिक वाढतो. प्रशासनाकडून केवळ कामे दाखविण्यापुरती केली जात असल्याची भावना नागरिकांमध्ये पसरली आहे. देवडी उड्डाण पुलावरील खड्डे तात्काळ दुरुस्त करून उड्डाण पुलावरील रेती मिश्रित माती काढून पथदिवे सुरू करण्याची गरज आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष की निधीअभावी अडथळेमहामार्ग प्राधिकरण व कंत्राटदार यांच्यातील समन्वयाअभावी दुरुस्तीचे काम होत नसल्याची चर्चा आहे. वेळोवेळी तक्रारी करूनही केवळ तात्पुरते पॅचवर्क करण्यात येते. निधी उपलब्ध असूनही कामे सुरू होत नाहीत की निधीअभावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची कामे अद्याप सुरू झाली नाहीत. अशीच कामाची गती राहिल्यास किमान त्याला दहा वर्ष लागणार काय असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रेकॉर्ड वेळेत काम करीत असल्याच्या दावा करते परंतु भंडारा बालाघाट या राष्ट्रीय महामार्गाबाबत अशी स्थिती का दिसत नाही, असा प्रश्न पडला आहे.