गरिबीचा फायदा घेत १० दिवसांच्या नवजात बालिकेचा डॉक्टरनेच २ लाखांत केला सौदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 15:17 IST2026-02-12T15:08:50+5:302026-02-12T15:17:52+5:30
Bhandara : उपचारासाठी आलेल्या कुटुंबाच्या गरिबीचा, असहायतेचा आणि अज्ञानाचा फायदा घेऊन परस्पर १० दिवसांच्या बालिकेची २ लाख रुपयात विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

Taking advantage of poverty, a doctor sold a 10-day-old newborn girl for Rs 2 lakh
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : उपचारासाठी आलेल्या कुटुंबाच्या गरिबीचा, असहायतेचा आणि अज्ञानाचा फायदा घेऊन परस्पर १० दिवसांच्या बालिकेची २ लाख रुपयात विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला गोंदियातील डॉक्टर आणि अन्य तीन सहभागी आरोपी फरार असून, एका महिलेला अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव लालेश्वरी नंदकिशोर सदेपाच (३९, रामनगर, गोंदिया) असे आहे. या प्रकरणात गोंदियातील सूत्रधार डॉक्टर तसेच बाळ खरेदी करणारी महिला मालती प्रकाश वाघमारे (४४, पांढरबोडी, ता. भंडारा) तसेच पूर्णिमा सतीश धुर्वे (३०) आणि उमेशसिंग रामचंद्रसिंग गेहलोत (४८, दोघेही गोंदिया) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. हे चौघेही फरार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, २ फेब्रुवारी रोजी भंडारा येथील महिला आणि बाल विकास विभागाच्या बाल हेल्पलाइनच्या टोल-फ्री क्रमांक १०९८ वर एक कॉल आला.
पांढरबोडी येथे एकटी राहणाऱ्या मालती वाघमारे या महिलेकडे १० दिवसांचे बाळ असल्याची माहिती त्यावरून मिळाली. चौकशी केली असता, तिच्यासोबत नवजात बाळ आढळले. ते गोंदियाहून दत्तक घेऊन आणल्याचे तिने सांगितले. तिला कागदपत्र घेऊन वरठी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले असता ती आली नाही. त्यामुळे पोलिसांनी घरी भेट दिली असता घराला कुलूप लावून ती चारचाकी वाहनाने पळून गेल्याची माहिती पुढे आली. त्या वाहनाचा पाठलाग करून मोहाडी येथील कुशारी क्रॉसिंगवर वाहन थांबविले. मात्र, त्यात पूर्णिमा धुर्वे ही महिला बाळासह आढळली. अधिक चौकशी केली असता, गोंदियातील डॉक्टरकडे सफाईसाठी नोकरीस असून, त्यांच्या सांगण्यावरून आपण या बाळाला तिकडे घेऊन जात असल्याचे सांगितले. या घटनाक्रमानंतर हे प्रकरण उघड झाल्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ८०, ८१, तसेच १४३ (४), १३७ (२) नोंदवून वरठी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
डॉक्टरचा आंतरराज्यीय तस्करीत सहभाग ?
गोपनीयतेच्या नावाखाली पोलिसांनी यातील सूत्रधार डॉक्टरचे नाव उघड करण्याचे टाळले आहे. उपचारासाठी येणाऱ्या गरीब पालकांना हेरून असा प्रकार येथे यापूर्वीही घडला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. यात त्याचे संबंध आंतरराज्यीय टोळीशी असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. डॉक्टरच्या शोधात पथके निघाली असून, त्याच्या अटकेनंतरच सर्व प्रकार बाहेर येणार आहे.
...डॉक्टरने खोटे बोलून केली विक्री
या बाळाचे पालक गोंदियातील आहेत. बुधवार, ४ फेब्रुवारी रोजी, ते बाल कल्याण समितीपुढे हजर झाले असता, हे त्यांचे तिसरे मूल असून, अशक्तपणामुळे उपचारासाठी गोंदियातील डॉक्टरकडे दाखल केले होते. उपचारांचा खर्च जास्त असल्याने, तुमचे बाळ नागपूरला एका सामाजिक संस्थेच्या मदतीने पाठवित असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात ते वरठीतील महिलेला विकून डॉक्टरांच्या सहकारी लालेश्वरी व मालती यांनी बालिकेच्या पालकाच्या खात्यात चेकद्वारे आणि रोख रक्कम जमा केल्याचे तपासात आढळून आले.