चहूबाजूच्या पुराने ग्रामीण भागात हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 05:00 AM2020-08-31T05:00:00+5:302020-08-31T05:01:00+5:30

गोसे प्रकल्पाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले असले तरी जलस्तरात सातत्याने वाढ होत आहे. याचाच फटका शनिवारच्या रात्रीपासून भंडारा तालुक्यालाही जाणवायला लागला. गोसेच्या बॅक वॉटर नांदोरा, ठाणा गावाच्या सीमेपर्यंत पोहचले. परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून हजारो एकर शेतजमीन पाण्याखाली आली आहे. खरीप हंगामातील पिकांना याचा सर्वाधिक फटका बसला असून शेतकरी विवंचनेत सापडला आहे.

Surrounding flood plagues in rural areas | चहूबाजूच्या पुराने ग्रामीण भागात हाहाकार

चहूबाजूच्या पुराने ग्रामीण भागात हाहाकार

Next
ठळक मुद्देग्रामीण भागाशी संपर्क तुटला : मागणी करूनही मदत नाही, अनेक मातींच्या घरांची पडझड, दानदाते व नागरिकच धावले मदतीला

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मध्यप्रदेशातील प्रकल्पाचे पाणी सोडल्यामुळे जिल्ह्यातील नदीनाल्यांना पूर आला आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील नदीकाठावर वसलेल्या गावांमध्ये पाणी शिरल्याने हाहाकार आहे. पुराची कुठलीही पूर्वसूचना नसल्याने अनेक कुटुंब संकटात सापडली असून शेजारधर्म व दानदात्यांनी मदत केल्याने अनेकांना वाचविण्यात यश आले आहे.
लाखांदूर : वैनगंगा नदीसह चुलबंद नदीला पूर आल्याने नदीकाठावरील गावांमध्ये पाणी शिरले आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व वैनगंगा नदीत पाणी सोडल्याने आलेल्या पुराचा फटका तालुक्यातील बहुतांश गावांना बसला आहे. पुराचे पाणी शिरले असताना ग्रामीण भागाशी संपर्क तुटला आहे. चुलबंद नदीवरील लाखांदूर - पवनी राज्यमार्गावरील पुलावर भागडी - चिचोली, मांढळ - दांडेगाव, धर्मापुरी - बोथली व बारव्हा - तई या मार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद पडली आहे. लाखांदूर - वडसा मार्गावरील चप्राड पहाडीनजीकच्या ओढ्यावर व लाखांदूर - मडेघाट ओढ्यावर पुराचे पाणी आल्याने मार्ग बंद झाले आहेत. वैनगंगा नदीत गोसे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने तालुक्यातील इटान, नांदेड, मोहरना, गवराळा, डांभेविरली, टेंभरी, विहिरगाव खैरी (पट) या गावात पुराचे पाणी शिरले आहे. हजारो हेक्टर मधील धानशेती व भाजीपाला पीक पाण्याखाली आले आहे. उल्लेखनीय म्हणजे चुलबंद नदीला तिसऱ्यांदा पूर आल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूरपतिस्थिती लक्षात घेता शासनाने या भागातील शेतपिकांसह नुकसान झालेल्या घरांचेही सर्वेक्षण करावे अशी मागणी आहे. तसेच शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करावा अशी मागणी होत आहे. लाखांदूर तालुक्यातील डोकेसरांडी येथील किशोर मेश्राम व जैतपूर येथील कवडू कोराम यांच्या घरांची पूर्णत: पडझड झाली. लाखांदूरचे तहसीलदार संतोष महल्ले, अन्य कर्मचारी, पोलीस निरीक्षक शिवाजी कदम आदी अधिकारी पूर परिस्थितीवर लक्ष देऊन आहेत. तालुक्यातील आवडी गावाला बेटाचे स्वरुप आले असून १०० टक्के शेती पाण्याखाली आली आहे. बॅकवॉटरमुळे ही स्थिती उद्भवली आहे. जवळपास ७५ ते ८० कुटुंब व ४०० लोकसंख्या असलेल्या या गावाचे तालुक्यातच पुनर्वसन करण्यात आले. मात्र आवडी येथे अजूनही अनेक कुटुंबांचे वास्तव्य आहे. लाखांदूर तालुक्यातील विरली खुर्द येथे पुराचे पाणी शिरल्यानंतर काहींनी स्वत:च्या घरावरच राहुटी उभारून आश्रय घेतला आहे.
तुमसर : मुसळधार पावसामुळे संजय सरोवर आणि बावनथडी प्रकल्पाचे दार उघडल्याने वैनगंगा नदी फुगली आहे. तुमसरसह मोहाडी तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील नवरगाव, उमरवाडा, तामसवाडी, बाम्हणी, कोष्टी, खैरलांजी आणि माडगी या गावात पुराचे पाणी शिरले आहे. बहुतांश शेती पाण्याखाली गेली आहे. वाहतूक ठप्प पडली आहे. व्यापारी, शेतकरी आणि वाहतुकदारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला असून सामान्य नागरिकांनाही विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शेकडो एकर जमीन पाण्याखाली आल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पाणी ओसरल्यानंतर पंचनामे करून शासन मदत देणार काय? असा प्रश्नही शेतकरी विचारीत आहेत. ज्या गावात पाणी शिरले तिथे तळ्याचे स्वरुप आले आहे. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंसह अन्य साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा पूरग्रस्तांना शासनाने तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शिवसेनेचे अमीत मेश्राम, जगदीश त्रिभूवनकर, सत्यनारायण कामथे, संतोष साखरवाडे, रवीशंकर ढोबणे, राजेंद्र शिरसाम आदींनी केली आहे.
शहापूर : प्रकल्पातील पाणी सोडल्याने वैनगंगेला पूर आल्यानंतर नाल्यांनाही पूर आला आहे. भंडारा तालुक्यातील शहापूर - नांदोरा मार्गावर असलेल्या नाल्यावरील पुलावर तीन फुट पाणी आहे. वैनगंगा नदीच्या जलस्तरात सातत्याने वाढ झाल्याने शहापूर परिसरातील नांदोरा, शहापूर, कवडसी, उमरी, दवडीपार गावांना पुराचा फटका बसला आहे. गुरुवार व शुक्रवारला मध्यप्रदेश व गोंदिया जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडल्याने नदीच्या जलस्तरात वाढ झाली आहे. गोसे प्रकल्पाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले असले तरी जलस्तरात सातत्याने वाढ होत आहे. याचाच फटका शनिवारच्या रात्रीपासून भंडारा तालुक्यालाही जाणवायला लागला. गोसेच्या बॅक वॉटर नांदोरा, ठाणा गावाच्या सीमेपर्यंत पोहचले. परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून हजारो एकर शेतजमीन पाण्याखाली आली आहे. खरीप हंगामातील पिकांना याचा सर्वाधिक फटका बसला असून शेतकरी विवंचनेत सापडला आहे. शनिवार व रविवारला दोन्ही दिवस पाऊस आला नसला तरी आलेल्या पुरामुळे घरांसह शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. गोसेखुर्द प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे परिसरातील दोन्ही बाजूच्या सखल भागात पाणी शिरले आहे. जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी अवस्था झाली आहे. नांदोरा - शहापूर या मार्गावरील असलेल्या नाल्याच्या पुलावरून तीन फुट पाणी वाहत असल्याने वाहतूक अजूनही ठप्पच आहे. परिणामी नांदोराचा शहापूर गावाशी संपर्क तुटला आहे. या पाण्यामुळे सन १९९४ च्या पुराची आठवण झाली आहे. सर्वाधिक पिपरी या गावाला १९९४ ला चांगलीच झळ बसली होती. त्यावेळी पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी तत्कालीन प्रधानमंत्री पी.व्ही. नरसिंहराव यांनी पिपरी येथे भेट दिली होती.
पवनी : पवनी तालुक्यालाही पुराचा फटका बसला आहे. नदीतिरावरील गावांमध्ये पाणी शिरल्याने अनेक मातीच्या घरांची पडझड झाली आहे. सर्वात वाईट अवस्था मांगली चौरास या गावात झाली आहे. चौरास पट्टा समजल्या जाणाºया पवनी तालुक्यात शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अड्याळ : पवनी तालुक्यातील रुयाड सिंदपुरी येथे असलेल्या क्वारंटाईन कक्षातही वैनगंगा नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. याचा फटका येथे असलेल्या कोविड रुग्णांनाही बसला आहे. पाणी शिरणार असल्याची माहिती रुग्णांनाही नव्हती.
जवाहरनगर / खरबी : भंडारा तालुक्यातील जवाहरनगर व खरबी परिसरातही पुराच्या पाण्याचा शिरकाव झाला. खराडी राजेदहेगाव व कोंढी गावाच्या वेशीवर पाणी साचले आहे. लोहारा व पेवठा या गावांचा संपर्क तुटला आहे. विशेष म्हणजे येथील पूरबाधितांना सुरक्षित स्थळी हलविल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

मांगली येथे १५० घरे पाण्याखाली
आसगाव : पवनी तालुक्यात असलेल्या गोसे धरणाचे पाणी सोडल्यामुळे वलनी, पौनाखुर्द, मांगली चौरास, इसापूर, उमरी, पवना बु. या गावाला पाण्याने पूर्णपणे वेढा घातला आहे. मांगली गावातील जुन्या वस्तीत ३० फुटांपर्यंत पाणी साचले आहे. गावातील १५० पेक्षा जास्त पाण्याखाली आली असून जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबाना जिल्हा परिषद शाळा येथे हलविण्यात आले आहे. शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पुरामुळे शेतपिकांची मोठी हानी झाली असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी सभापती मेघश्याम वैद्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल बावनकर, पंचायत समिती सदस्य अर्चना वैद्य यांनी केली आहे.

विजेचा लपंडावाने नागरिक त्रस्त

शहरासह ग्रामीण भागात पुरामुळे नानाविध समस्या उभ्या ठाकल्या आहेत. त्यात विजेची समस्या प्रामुख्याने नागरिकांना त्रस्त करून ठेवत आहे. शहरातही विजेच्या लपंडावाने नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. शनिवारी रात्री ९ वाजतापासून भंडारा शहरातील विविध भागात कित्येक वेळा विद्युत पुरवठा खंडीत झाला. कधी १० मिनिट तर कधी पंधरा मिनिटे विद्युत खंडीत झाली. रात्रीला तर कहरच झाला. जवळपास दोन तासांपर्यंत मध्यरात्रीला पुरवठा खंडीत झाला. विजेच्या लपंडावाचा सर्वात जास्त फटका आबालवृद्धांना बसला. रविवारी सकाळपासून वीजपुरवठा खंडीत होता. शहरातील मोठा बाजार परिसर ते तुकडोजी वॉर्डपर्यंतचा भाग अंधारात होता. वृत्त लिहिपर्यंत या परिसरातील विद्युत पुरवठा बंद होता.
 

Web Title: Surrounding flood plagues in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.