The social distancing in the Market | बारव्हा बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

बारव्हा बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

ठळक मुद्देभाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची गर्दी : स्थानिक पदाधिकारी व संबंधित पोलीस विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
बारव्हा : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार कलम १४४ लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांना गर्दी करण्यास सक्त मनाई आहे. तरीही नागरिक शासनाच्या सचारबंदीला धुडकावून मुक्त संचार करीत आहेत.
लाखांदूर तालुक्यातील बारव्हा येथे सोमवारी आठवडी बाजार भरतो. ३० मार्च रोजी आठवडी बाजार भरविण्यात आला. भाजीपाला विक्रेत्यांनी सदर बाजार नेहमीच्या ठिकाणी भरविण्यात आला. मात्र भाजीपाला खरेदी करताना नागरिक सोशल डिस्टन्सिंग न बाळगता मोठ्या प्रमाणात गर्दी केली. गर्दी टाळण्यासाठी स्थानिक पदाधिकारी व संबंधित पोलीस विभागाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने जागरूक नागरिकांनी यावर रोष व्यक्त केला आहे.
गेल्या आठवड्यात खोलमारा टी-पांईट व बारव्हा बसस्थानक परिसरात बाजार भरला होता, पुन्हा तिथेच बाजार भरविण्याचा प्रयत्न भाजीपाला विक्रेत्यांनी केला होता. मात्र पोलिसांनी त्यांना मनाई केली व बाजार मुख्य बाजारपेठेत भरविण्यात आला. तर दुसरीकडे बाजारात भाजीपाला घेण्यासाठी शेकडो नागरिकांनी कोणतीही सुरक्षितता न बाळगता मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे कोरोना व्हायरस पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर प्रकार घडत असताना पोलिस विभाग मात्र कोणतीही कारवाई केली नाही.
संबंधित दिघोरी पोलीस विभाग या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देत नसल्याने बारव्हा परिसरातील नागरिक सोशल डिस्टन्सिंग न बाळगता मुक्त संचार करीत आहेत. नागरिकांवर पोलिस विभागाचा कोणताही वचक नसल्याने महत्त्वाचे काम नसतानासुद्धा नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत.
भाजीपाला, किराणा, औषधी आदी वस्तू जीवनावश्यक वस्तू असल्याने नागरिकांना खरेदी करणे आवश्यक आहे मात्र वस्तू खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंग ठेवणे तेवढेच गरजेचे आहे. भारत देशासह संपूर्ण जगात कोरोणा व्हायरसने कहर केला आहे. नागरिक घराबाहेर न पडता दहशतीच्या वातावरणात जीवन जगत आहेत. तर दुसरीकडे कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. आपल्या जिवाची पर्वा न करता दुसऱ्या लोकांचा जीव धोक्यात घालत आहेत. नागरिकांनी जागरूकता बाळगली नाही तर संसर्गाचा धोका आहे.

Web Title: The social distancing in the Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.