भंडारा जिल्ह्यात वाघाची शिकार करणाऱ्या सहा जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 17:31 IST2019-06-30T17:17:35+5:302019-06-30T17:31:39+5:30
शेतात विजेचा करंट लावून वाघाची शिकार करणाऱ्या सहा जणांना वनविभागाने धाड टाकून अटक केली आहे. ही कारवाई तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथे करण्यात आली.

भंडारा जिल्ह्यात वाघाची शिकार करणाऱ्या सहा जणांना अटक
भंडारा - शेतात विजेचा करंट लावून वाघाची शिकार करणाऱ्या सहा जणांना वनविभागाने धाड टाकून अटक केली आहे. ही कारवाई तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथे करण्यात आली. त्यांच्या जवळून वाघाचे कातडे, २२ वाघनखे आणि चितळाचे सात शिंग जप्त करण्यात आले.
वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय यांना मिळालेल्या माहितीवरून तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथील मनिराम आनंदराम गंगबोयर याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या घरात वाघाचे कातडे आणि चितळाचे सात शिंग तसेच रानडुकराचे मांस आढळून आले. प्राथमिक तपासानुसार मनीराम गंगबोयर याने शिव मदन कुंभरे याच्या मदतीने विजेचा करंट देऊन शुक्रवार २८ जून रोजी वाघाची शिकार केली. त्या शिकारीसाठी वापरण्यात आलेले तार बांबूच्या खुट्या जप्त करण्यात आल्या. तर याच वेळी शिकार करण्यात आलेल्या रानडुकराचे मांस शिव कुमरे याने विजय सुंदरलाल पारधी रा. गुडरी आणि रविंद्र किसन रहांगडाले रा.गोबरवाही ता. तुमसर यांना विकले.
मनिराम गंगापूर यांच्या घराची पुन्हा झडती घेतली असता घरातून वाघाचे २२ नखे व बिबट्याचे दोन नखे जप्त करण्यात आली. मनीराम व व शिव कुंभरे यांनी वाघाची शिकार करून कातडे काढून सांगाडा आरक्षित जंगलात पुरला होता. तो सांगाडा वनविभागाने हस्तगत केला. तसेच या प्रकरणाशी संबंधित आरोपी चमरू ताराचंद कोहळे व रोहित नरसिंग भत्ता अ. सीतासावंगगी यांना अटक करण्यात आली. न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना ५ जुलैपर्यंत वन कोठडी देण्यात आली आहे.