राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये खेळाडूंचे प्रमाणपत्रे विकल्याचे धक्कादायक आरोप ! क्रीडा क्षेत्रात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 19:11 IST2025-11-17T19:09:07+5:302025-11-17T19:11:33+5:30
Bhandara : राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धामध्ये गंभीर गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. ७२ वी स्पर्धा बल्लारपूर (जि. चंद्रपूर) येथे झाली होती.

Shocking allegations of selling players' certificates in state-level Kabaddi competitions! A stir in the sports sector
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धामध्ये गंभीर गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. ७२ वी स्पर्धा बल्लारपूर (जि. चंद्रपूर) येथे झाली होती. त्यामध्ये विजेते ठरलेल्या तीन खेळाडूंना प्रमाणपत्रे न देता परस्पर विकली गेली. नंतर त्यांची समजूत घालून तुमसर (जि. भंडारा) येथे झालेल्या ७३ व्या स्पर्धेत भंडारा जिल्हा संघाकडून त्यांना खेळवून गैरप्रकार करण्यात आला, अशी गंभीर तक्रार यवतमाळ जिल्ह्यातील हरजिंदर सिंग हरबन सिंग सौखी यांनी भंडारा जिल्हाधिकारी तसेच तुमसर पोलिसांत नोंदविली आहे.
अमॅच्युअर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ व भंडारा जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत तुमसर येथे ७३ वी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा (आमदार चषक) झाली होती. यात संघ निवड प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आणि काही खेळाडूंकडून पैसा घेऊन संघात निवड केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार, स्पर्धेपूर्वी झालेल्या निवड चाचणीनंतरही भंडारा जिल्ह्याचा अधिकृत संघ जाहीर करण्यात आला नाही. शेवटच्या क्षणी काही निवडक खेळाडूंना गुप्तपणे मैदानात उतरवून सामने खेळविण्यात आले. स्कोरशीटवर खेळाडूंची नावे लिहिली गेली नाहीत आणि सर्व सामने अप्रकाशित स्वरूपात खेळवले गेले, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तुमसर पोलिसांनी या तक्रारीची नोंद केली असून अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. सहायक पोलिस निरीक्षक किशोर घोडेस्वार यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला आहे.
या पदाधिकाऱ्यांवर झाले थेट आरोप
या प्रकरणात असोसिएशनचे जितेंद्रसिंग ठाकूर, सतीश डफले, प्रदीप शेलोकर, तसेच भंडारा जिल्ह्याचे सचिव विनायक वाघ आणि गोंदियाचे सचिव एस. ए. वहाब यांच्यावर थेट आरोप करण्यात आले आहेत. या पदाधिकाऱ्यांकडून पूर्वीपासूनही कबड्डी प्रमाणपत्र विक्री व भ्रष्टाचाराचे प्रकार झाले असल्याचा आरोप हरजिंदर सिंग हरबन सिंग सौखी यांनी केला आहे. या प्रकरणी आता कारवाईकडे लक्ष लागले आहे.
तीन खेळाडूंना प्रमाणपत्र न देता फसविले
बल्लारपूर (चंद्रपूर) येथे पार पडलेल्या ७२ व्या स्पर्धेत गोंदिया जिल्ह्याचे खेळाडू शुभम मेंढे, गौरव राऊत आणि विजय मरस्कुले यांना तृतीय क्रमांकाचे प्रमाणपत्र देण्यात आले नव्हते. ते प्रमाणपत्र पुढे इतर खेळाडूंना विकल्याचा आरोप तक्रारीत असून संबंधितांना धमकावून शांत राहण्यास भाग पाडले गेले असल्याचे हरजिंदर सिंग हरबन सिंग सौखी यांनी म्हटले आहे.