राज्यात ५,८६६ कोटी रुपये कुणीही दावा न केल्याने बेवारस बँकेत पडून
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 18:49 IST2025-10-11T18:49:20+5:302025-10-11T18:49:42+5:30
Bhandara : देशभरात सुमारे १ लाख ३५ हजार कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी विविध बँकांमध्ये शिल्लक आहेत.

Rs 5,866 crore in the state is lying unclaimed in the bank.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : देशभरात सुमारे १ लाख ३५ हजार कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी विविध बँकांमध्ये शिल्लक आहेत. महाराष्ट्र राज्यात ५,८६६ कोटी रुपये अद्याप कुणीही दावा न केल्याने बेवारस स्थितीत पडून आहेत. ज्यात वैयक्तिक खात्यांच्या ४,६१२ कोटी, संस्थांच्या १,०८२ कोटी आणि सरकारी योजनांतील १७२ कोटी रुपयांच्या ठेवी समाविष्ट आहेत. खातेदारांना ठेवी परत मिळवून देण्यासाठी शासनाने विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, १० वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या खात्यांतील ठेवी, ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीमध्ये हस्तांतरित केल्या जातात. तथापि, खातेदारांना आपले पैसे परत मिळविण्याचा पूर्ण हक्क आहे.
३२ कोटींच्या ठेवी शिल्लक
भंडारा जिल्ह्यातील विविध बँकांमधील वैयक्तिक, संस्थात्मक आणि सरकारी योजनांच्या खात्यांमध्ये सुमारे ३२ कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी शिल्लक आहेत. या ठेवींचा एकूण १,५०,४१२ खातेदारांना परतावा मिळवून देण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.
"जिल्ह्यात दावा न केलेल्या ठेवी परत मिळविण्यासाठी खातेदारांना आवाहन करणारी मोहीम १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविली जात आहे. जिल्हा अग्रणी बँक आणि बँक ऑफ इंडिया यांच्या पुढाकाराने व सर्व सदस्य बँकांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येत आहे. यावर कार्य सुरू आहे."
- राजू नंदनवार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, भंडारा.