साखर कारखान्यातील अपघातग्रस्तांना आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:30 AM2021-01-17T04:30:42+5:302021-01-17T04:30:42+5:30

मानस साखर कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेसाठी कोणतेही साधन उपलब्ध नाही. एखाद्या वेळी लहान-मोठी दुर्घटना घडली तर त्याकरिता साधी ...

Provide financial assistance to accident victims in sugar factories | साखर कारखान्यातील अपघातग्रस्तांना आर्थिक मदत द्या

साखर कारखान्यातील अपघातग्रस्तांना आर्थिक मदत द्या

Next

मानस साखर कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेसाठी कोणतेही साधन उपलब्ध नाही. एखाद्या वेळी लहान-मोठी दुर्घटना घडली तर त्याकरिता साधी प्रथमोपचार सुविधासुद्धा उपलब्ध नाही. ८ डिसेंबर २०२० ला प्रेमलाल पटले व राधा प्रसाद हे दोन कर्मचारी खलासी युनिटमध्ये काम करीत असताना उसाच्या रसाचा पाईप फाटल्याने ते गंभीररीत्या भाजल्या गेले. तसेच २ जानेवारी २०२१ ला योगेश भोयर याचे हात भाजले गेले. काही दिवसापूर्वी पवन लाळे, संदीप बागडे यांचे ॲसिडयुक्त पाण्याने अंग भाजल्या गेले होते. परंतु कारखान्यातर्फे त्यांना एक रुपयाचीही आर्थिक मदत देण्यात आलेली नाही.

बॉयलरच्या भट्टीमध्ये कोळसा किंवा लाकूड जाळायला हवे, परंतु बायलरच्या भट्टीमध्ये उसाचे चिपाड जाळण्यात येते. तसेच कारखान्याचे दूषित निकामी पाणी चोरखमारा नहरात सोडले जात आहे आणि नहरातून हे दूषित पाणी शेतकऱ्यांच्या शेतात गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे पीक नष्ट झाले. याची तक्रार प्रदूषण अधिकारी भंडारा यांना करण्यात आल्यानंतरही त्यांनी कोणत्याच प्रकारची चौकशी केली नाही. याच मागणीकरिता ५ जानेवारीला शिवसेनेतर्फे रास्ता रोको करण्यात येणार होता. परंतु कारखाना व्यवस्थापन व पोलीस विभागातर्फे १० दिवसात समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र १५ दिवस उलटूनही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे २० जानेवारी रोजी शेतकऱ्यांना घेऊन शिवसेनेतर्फे मानस साखर कारखाना देव्हाडासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे. पत्रपरिषदेला शिवसेना तालुकाप्रमुख अनिल सार्वे, उपतालुकाप्रमुख मधुकर बुरडे, भारतीय विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख डॉक्टर हेमंत रहांगडाले, शिवसेना शहरप्रमुख मोहर तेलंग, उपतालुकाप्रमुख प्रणय चव्हाण व शेतकरी उपस्थित होते.

बॉक्स

धुरातील बारीक कणाने डोळ्यांचा त्रास

साखर कारखान्याचा ॲसिडयुक्त पाणी व वायू प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. बॉयलरसाठी उसाचे चिपाड जाळत असल्याने तसेच चिमणीची उंची कमी असल्यामुळे जळलेल्या चिपाड्याचे कण हवेत पसरतात व जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांना डोळ्यांचा भयंकर त्रास होतो. कारखान्याच्या पाच ते सहा किलोमीटरपर्यंत राखेचे सूक्ष्म कण पसरलेले आहेत. उसाचा निकामी झालेला लगदा हा रोडच्या बाजूलाच टाकल्याने, सडलेल्या लगद्यामुळे अतिशय दुर्गंधी पसरलेली असून, जाणाऱ्या-येणाऱ्यांना त्या दुर्गंधीचा भयंकर त्रास होत आहे. त्यामुळे कारखान्याने ॲसिडयुक्त पाण्याची योग्य विल्हेवाट लावावी व प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.

Web Title: Provide financial assistance to accident victims in sugar factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.