रांगोळीतून कलावंतांच्या अनमोल कलेचे प्रदर्शन
By Admin | Updated: January 6, 2016 00:50 IST2016-01-06T00:50:07+5:302016-01-06T00:50:07+5:30
विविध कलात्मक रांगोळी चित्र रेखाटन करून कलावंतांनी आपल्या अनमोल प्रतिभा कलेचे प्रदर्शन केले आहेत.

रांगोळीतून कलावंतांच्या अनमोल कलेचे प्रदर्शन
रांगोळी उत्सवाचे थाटात उद्घाटन : जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचे प्रतिपादन
भंडारा : विविध कलात्मक रांगोळी चित्र रेखाटन करून कलावंतांनी आपल्या अनमोल प्रतिभा कलेचे प्रदर्शन केले आहेत. कला गुणांच्या बळावर प्रतिभेची चुणूक दाखविणाऱ्या या कलावंतांचे कार्य वाखाणण्यासारखे आहे. यांच्या प्रतिभा कलेचे प्रदर्शन बघून मी भारावून गेलो आहे. वैनगंगा महोत्सवातसुद्धा या कलावंतांनी कला प्रतिभेशी जिल्ह्यातील प्रेक्षकांना परिचित करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.
३ जानेवारीला शितला माता मंदीर हॉल येथे आयोजित भव्य रांगोळी उत्सव कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवी केशवराव निर्वाण, लायन्स क्लबचे अध्यक्ष रामदास शहारे, ग्रीन हेरिटेज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहम्मद सईद शेख, प्रयासचे अध्यक्ष निकेत क्षिरसागर, आशिता क्लॉसेसचे आयोजक प्रकाश मुरकूटे, कुमार आर्टचे संचालक शरद लिमजे, अनुप भांडारकर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी हस्ते फित कापून रांगोळी प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी मोठ्या बारकाईने प्रत्येक रांगोळीचे निरीक्षण करून त्या विषयी माहिती घेतली व रांगोळी काढणाऱ्या प्रत्येक कलाकारांचे कौतुक केले. उद्घाटक व प्रमुख पाहुण्याचे पुष्पगुुच्छ व सन्मानचिन्ह देवून स्वागत करण्यात आले.
केशवराव निर्वाण, रामदास शहारे, सईद शेख, निकेत क्षीरसागर आदींनी आपले मनोगत व्यक्त करून कलावंतांचे कौतुक केले.
यावेळी चंदा मुरकूटे, शरद लिमजे, निता मालेवार, अनघा चेपे, कल्पना घुगल, हंसाताई वंजारी, दिपक कुंभरे, शेषकुमार शेंडे, शालू तिडके, मयुरी दुरूगकर, नूतन तिडके, शारदा लिमजे, सुरेखा खोब्रागडे, मयुरी लिमजे, प्रवीण कुंभारे, दिपाली गायधने, अनिता चौधरी, मोनू वाडीभस्मे, चेतना नेवारे, रवि उपरीकर, सुनिता धांडेकर, समृद्धी चेपे, सीमा हटवार आदी कलावंतांनी आकर्षक व कलात्मक विविध रांगोळी काढून आपल्या कलेचे प्रदर्शन केले असता जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या हस्ते या सर्व कलावंतांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना प्रत्येक कलावंतांच्या चेहऱ्यावर हास्य व आनंदाचा झरा ओसंडून वाहत होता.
अनघा चेपे यांनी संचालन व आभार प्रदर्शन केले. गणेश वंदणावर आधारित नृत्याचे आशिता मुरकूटे, गार्वी रणदिवे, शर्वरी हटवार यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. यांना सुद्धा जिल्हाधिकारी हस्ते पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. अनेक महापुरूष, राधाकृष्ण, गणपती, झाशीची राणी लक्ष्मीबाई, वार्ली, मधुबनी, मिटकी, पैठणी साडी, टेन्सिल, सिनेरी, टु-डी, थ्री-डी, बिंदू, बेटी-बचाव अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या रूपात संदेश देणाऱ्या मनमोहक रांगोळी काढण्यात आले असून भंडारेकरांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.
ग्रीन हेरिटेज संस्था भंडारा, नुपूर निकेतन संस्था नागपूर, कुमार आर्टस भंडारा व प्रयास संस्था व शितला माता मंदीर ट्रस्ट भंडारा आदीचे विशेष सहकार्य लाभले.
शिबिराचे आयोजन ६ ते ९ जानेवारीपर्यंत राहणार असून यामध्ये आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहेत. रांगोळी प्रदर्शनी ९ जानेवारीपर्यंत खुली राहणार आहे.
(प्रतिनिधी)