धानपिकाचे नुकसान, मात्र पीकविमा मिळेना ! शेतकऱ्यांचा वाढतोय रोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 18:30 IST2025-11-01T18:27:52+5:302025-11-01T18:30:46+5:30
Bhandara : धानाचे पीक कापणीस तयार झालेल्या शेतकऱ्यांनी कापणी केली, तर अनेक शेतकऱ्यांचे धानपीक डौलात उभे होते. परंतु, अचानक झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले.

Paddy crop damaged, but no crop insurance! Farmers' anger is growing
दिघोरी मोठी : परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षांवर पाणी फेरले आहे. गेल्या तीन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात उभे असलेले धानाचे पीक पूर्णपणे आडवे झाले असून, अनेक ठिकाणी धानाला अंकुर आले असून, कणसे काळी पडून कुजण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरीवर्ग आर्थिकदृष्ट्या कोलमडला असताना पीकविमा मिळण्यात मात्र विलंब होत आहे.
धानाचे पीक कापणीस तयार झालेल्या शेतकऱ्यांनी कापणी केली, तर अनेक शेतकऱ्यांचे धानपीक डौलात उभे होते. परंतु, अचानक झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले. या ओलाव्यामुळे पीक कुजले, कणसे गळून पडली आणि उत्पादनात मोठी घट येणार आहे.
सरकारकडून पीकविमा योजनेअंतर्गत भरपाई मिळावी, अशी अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अनेकांनी पीकविमा हप्ते भरले असतानाही तपासणी आणि पंचनामे करण्यात प्रशासनाचा वेग अत्यंत कमी असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार, ऑनलाइन अर्ज सादर करूनही विमा कंपनीकडून प्रतिसाद मिळत नाही.
दिघोरी मोठी, मुर्झा, झरी, मालदा, तावशी परिसरात या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे ५० ते ७० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. ग्रामपंचायत आणि कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत मिळवून द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी समित्यांनी केली आहे. यावर शासन काय निर्णय घेते याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांची मागणी
पीकविम्याचे तत्काळ सर्वेक्षण व पंचनामे करावेत. नुकसानग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत द्यावी. विमा कंपन्यांनी प्रतिसाद न दिल्यास शासनाने थेट हस्तक्षेप करावा. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शासन व प्रशासनाने वेळेत मदत न केल्यास शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. लोकप्रतिनिधी मात्र या विषयावर मूग गिळून असल्याने शेतकऱ्यांचा रोष वाढत आहे.