ना ड्युटीचे निश्चित तास... ना कुटुंबीयांसाठी मिळतोय वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:25 AM2021-05-28T04:25:59+5:302021-05-28T04:25:59+5:30

युवराज गोमासे करडी (पालोरा) : कोरोना महामारीचा भयंकर दुष्परिणाम दुसऱ्या टप्प्यात मोहाडी तालुक्यातील करडी परिसरात पाहावयास मिळाला. परंतु अत्यंत ...

No fixed hours of duty ... no time for family | ना ड्युटीचे निश्चित तास... ना कुटुंबीयांसाठी मिळतोय वेळ

ना ड्युटीचे निश्चित तास... ना कुटुंबीयांसाठी मिळतोय वेळ

Next

युवराज गोमासे

करडी (पालोरा) : कोरोना महामारीचा भयंकर दुष्परिणाम दुसऱ्या टप्प्यात मोहाडी तालुक्यातील करडी परिसरात पाहावयास मिळाला. परंतु अत्यंत बिकट स्थितीतही करडी पोलीस अपुरे मनुष्यबळ असताना १२ ते १४ तास राबले. वेळप्रसंगी सहकाऱ्यांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळून कर्तव्य बजावले. त्यामुळे वेळेवर जेवण, झोप, स्वतःबरोबर कुटुंबीयांचे आरोग्य व अन्य गरजा पूर्ण करण्यास असमर्थ ठरत आहे. त्यामुळे पोलिसांत मानसिक ताण-तणावाची बाब प्रकर्षाने समोर येताना दिसून येत आहे.

करडी परिसरात २५ गावांचा समावेश आहे. सुमारे ४० हजार लोकसंख्या आहे. दोन कारखाने आणि चार बाजारपेठा आहेत. करडी पोलीस स्टेशनअंतर्गत दोन अधिकारी आणि ४७ अंमलदारांची पदे मंजूर आहेत. सध्या मंजूर पदांपैकी दोन अधिकारी आणि दोन चालकांसह २३ अंमलदार कार्यरत आहेत. यात पाच महिला पोलीस शिपायांचा समावेश आहे. कोरोना महामारी सुरू असताना परिसरात दारू, जुगार, चोरी, किरकोळ दुखापत, घरफोडी, अपघात, बलत्कार व अपहरण यांसारखे गुन्हे पोलिसांचा ताण-तणाव वाढविण्यास कारणीभूत ठरले. अपुरे मनुष्यबळ, त्यातच कामाचा ताण, तर दुसरीकडे जीवाची भीती पोलिसांना सतावताना दिसत आहे.

कोरोना संकट काळाच्या दुसऱ्या टप्प्यात अनेकांचे आधार हरविले. काहींची कुटुंबे मृत्यूच्या जबड्यात गेली. ना मायेचा हात फिरला, ना स्वकियांची सोबत मिळाली. अखेरचे दर्शनही मिळाले नाही. सर्वांना जीवाची भीती वाटत असताना करडी पोलिसांनी जनजागृती मोहीम २५ गावात राबविली. अनेकांना मदतीचा हात दिला. आपद्ग्रस्त कुटुंबीयांच्या हाकेला धावले. कर्तव्याचे १२ तास असतांना १४ ते १८ तास राबले. दिवसाबरोबर रात्रगस्त केल्या. अनेक गुन्ह्यांचा वेळेत तपास केला. परंतु या सर्व प्रकारात ना ड्युटीचे निश्चित तास राहिले ना कुटुंबीयांना वेळ देता आला.

बॉक्स

पोलिसांना भेडसावणाऱ्या समस्या

करडी येथे पोलीस ठाणे असले तरी येथे शासकीय वसाहत नाही. घर देता का घर, अशी विचारणा केल्यावरही वेळेत किरायाचे घर मिळत नाही. बायको, मुले शहरात, तर पोलीस नवरा गावात, अशी परिस्थिती आहे. शिक्षण, आरोग्य आणि जीवनावश्यक इतर गरजांसाठी वारंवार शहरांकडे धाव घ्यावी लागते वा इतर सहकाऱ्यांना कामे सांगावी लागतात.

बॉक्स

बदल्यांमुळे वाढणार घोळ

पाच वर्षे पूर्ण झालेले १२ कर्मचारी बदली होण्याच्या मार्गात आहेत. परंतु येणारे कर्मचारी लहान पोलीस ठाण्यात रूजू होण्याच्या मानसिकतेत नसतात. त्यामुळे आणखी घोळ होण्याची शक्यता आतापासूनच व्यक्त होताना दिसत आहे.

बाॅक्स

अपुऱ्या जागेत कार्यालयीन कामकाज

सध्या करडी पोलिसांचे कामकाज चौकीसाठी बांधलेल्या इमारतीतून चालविले जात आहे. कामकाज वाढले. परंतु जागा न वाढल्याने कोरोना संकटात जिथे सोशल डिस्टन्स ठेवण्याचा सल्ला दिला जातो, त्या पोलिसांनाच अपुऱ्या जागेत बसून कारभार चालवावा लागत आहे. नवीन पोलीस ठाणे व कर्मचारी वसाहतीचे आश्वासन हवेत विरल्याचा आभास होतांना दिसत आहे.

कोट

करडी ठाण्यात मंजूर पदांपैकी निम्मेच अंमलदार कार्यरत आहेत. दिवस व रात्रपाळीत प्रत्येकी चार कर्मचारी लागतात. चेकपोस्ट दोन, गोपनीय शाखा, गुन्हे शाखा, मुद्देमाल, टॅफीक, कोर्ट, अकाऊंट व अन्य कामकाजासाठी मनुष्यबळाची गरज असते. सर्वांचे आठ ८ तासांचे काम निश्चित असले तरी कोरोना संकटात दगदग व ताणतणाव वाढत असतो.

- नीलेश वाजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, करडी

Web Title: No fixed hours of duty ... no time for family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.