भंडाऱ्यात काँग्रेसने भाजप फोडली; गोंदियात भाजपच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेस धावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2022 10:29 AM2022-05-11T10:29:53+5:302022-05-11T10:40:11+5:30

या नवीन समीकरणामुळे जिल्ह्यातील राजकारणाला एक नवीन कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

new political equations in bhandara and gondia district after ZP elections | भंडाऱ्यात काँग्रेसने भाजप फोडली; गोंदियात भाजपच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेस धावली

भंडाऱ्यात काँग्रेसने भाजप फोडली; गोंदियात भाजपच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेस धावली

Next
ठळक मुद्देजि.प. अध्यक्षपदाची निवडणूक : शह-काटशहच्या राजकारणात 'पॉलिटिकल गेम'

भंडारा / गाेंदिया : भंडारा जिल्हा परिषदेत नाट्यमय घडामाेडी घडत भाजपचे पाच सदस्य फाेडून एका अपक्षाच्या मदतीने काँग्रेसनेजिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पटकावले, तर भाजपच्या फुटीर गटाच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडली. अध्यक्षपदी काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे, तर उपाध्यक्षपदी विकास फाउंडेशनचे (भाजप फुटीर गट) संदीप ताले यांची निवड करण्यात आली. गाेंदियामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, चाबी आणि अपक्ष सदस्यांनी एकत्र येत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा नवीन फाॅर्म्युला तयार केला. त्यामुळे अध्यक्षपदी भाजपचे पंकज रहांगडाले, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत गणवीर यांची वर्णी लागली.

भंडारा जिल्हा परिषदेत भाजपचे १२, काॅंग्रेसचे २१, राष्ट्रवादीचे १३, अपक्ष ४ आणि बसप व शिवसेना प्रत्येकी एक असे ५२ सदस्य आहेत. कुण्या एका पक्षाला बहुमत नसल्याने कुणाची सत्ता येणार याची उत्सुकता हाेती. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने राष्ट्रवादीला बाजूला सारत भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्याशी हातमिळवणी केली. अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून काेंढा गटाचे सदस्य गंगाधर जिभकाटे यांचे नामांकन दाखल केले, तर राष्ट्रवादीच्या वतीने अविनाश ब्राह्मणकर यांचे नामांकन दाखल करण्यात आले. उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या फुटीर गटाचे संदीप ताले यांच्यासह भाजपच्या माहेश्वरी नेवारे आणि प्रियंका बाेरकर यांनी नामांकन दाखल केले.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात मतदान हाेऊन काँग्रेसचे जिभकाटे यांना २७, तर राष्ट्रवादीचे अविनाश ब्राह्मणकर यांना २५ मते मिळाली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी गंगाधर जिभकाटे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत संदीप ताले यांना २७ मते मिळाली. त्यामुळे त्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या बाहेर प्रचंड गर्दी झाली हाेती. पाेलिसांनी तगडा बंदाेबस्त लावला हाेता.

गोंदिया जिल्हा परिषदेत एकूण ५३ सदस्य असून, भाजप २६, काँग्रेस १३, राष्ट्रवादी काँग्रेस ८ आणि चाबी ४ व अपक्ष २, असे बलाबल आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी २७ या मॅजिक फिगरची गरज होती. भाजपला हा आकडा गाठण्यासाठी अपक्ष सदस्यांची मदत घेणे आवश्यक होते. मात्र, जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याला घेऊन मागील आठ दिवसांत झालेल्या नाट्यमय घडामोडी पाहता भाजपने रिस्क न घेता राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष सदस्यांना घेऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. भंडाऱ्यात काँग्रेसने राष्ट्रवादीसह दगाफटका केल्याने त्यांनी याची भरपाई भरून काढत गोंदियात भाजपसोबत जात व उपाध्यक्षपद मिळवीत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या सदस्यांना प्रत्येकी ४० मते मिळाली, तर काँग्रेसचे १३ सदस्य एकनिष्ठ राहिल्याने त्यांच्या सदस्यांना १३ मते मिळाली. मात्र, या नवीन समीकरणामुळे जिल्ह्यातील राजकारणाला एक नवीन कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

सभागृहात झटापट

भंडारा जिल्हा सभागृहात सदस्यांमध्ये चांगलीच झटापट झाली. यात भाजपचे प्रियंका बाेरकर, गणेश निरगुळे, विनाेद बांते व्हिप देण्यासाठी गेले हाेते. त्यावेळी भाजप बंडखाेर व काँग्रेस सदस्यांत वाद हाेऊन प्रकरण धक्काबुक्कीवर पाेहाेचले. याचवेळी तेथे उपस्थित भाजपच्या महिला सदस्या माहेश्वरी नेवारे यांना धक्का मारून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटले. या मारहाणीची तक्रार देण्यासाठी सदस्यांनी पाेलीस ठाण्यात धाव घेतली हाेती.

चरण वाघमारे भाजपमधून सहा वर्षांसाठी निलंबित

भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखाेरी करीत काँग्रेसला मदत करणारे भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले. यासाेबतच तुमसर व माेहाडी तालुक्यातील सर्वस्तरीय भाजप कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. भाजपमधून फुटलेल्या पाच सदस्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Web Title: new political equations in bhandara and gondia district after ZP elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.