भंडाऱ्यातील फॅक्टरीत भीषण स्फोट; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, माहिती देत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 15:31 IST2025-01-24T15:30:18+5:302025-01-24T15:31:43+5:30
Bhandara Blast: बचाव कार्यासाठी एसडीआरएफ तसेच नागपूर महापालिकेची चमू सुद्धा पाचारण करण्यात आल्या असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

भंडाऱ्यातील फॅक्टरीत भीषण स्फोट; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, माहिती देत म्हणाले...
CM Devendra Fadnavis: भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माणी जवाहर नगर येथे आज सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास एका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून काही कामगार जमखी असल्याचे समजते. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त करत मदतकार्याविषयी माहिती दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "भंडारा जिल्ह्यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील स्फोटाच्या घटनेत छत कोसळून १३ ते १४ कामगार अडकल्याचे वृत्त आहे. त्यातील ५ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी असून सर्व प्रकारची मदत पुरवण्यात येत आहे. बचाव कार्यासाठी एसडीआरएफ तसेच नागपूर महापालिकेची चमू सुद्धा पाचारण करण्यात आल्या असून त्या लवकरच पोहोचतील. संरक्षण दलासोबत जिल्हा प्रशासन समन्वयाने मदत कार्यात सहभागी आहे. वैद्यकीय मदतीसाठी सुद्धा चमू सज्ज ठेवल्या आहेत," अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.
"दुर्घटनेतील मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो," असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, स्फोटाच्या या घटनेनं भंडारा जिल्ह्यात खळबळ उडाली असून पुन्हा एकदा कामगारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.