उद्याचा वाढदिवस, घरच्यांची जोरदार तयारी... अन् आज त्याने डोळे कायमचे मिटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 16:11 IST2021-12-29T15:52:12+5:302021-12-29T16:11:50+5:30
उद्या बाबांचा वाढदिवस म्हणत तयारीसाठी लागलेली पोरं, घरात आनंदाच वातावरण असतानाच अचानक कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. वाढदिवसाच्या एक दिवसाआधीच रोशनचा मृत्यू झाल्याने घरच्यांना मोठा धक्का बसला.

उद्याचा वाढदिवस, घरच्यांची जोरदार तयारी... अन् आज त्याने डोळे कायमचे मिटले
भंडारा : ३० डिसेंबर आपला वाढदिवस आहे. तो घरच्या लहान मुलांसोबत साजरा करणार, असे ठरले असतानान एक दिवस अगोदर कोंढा येथील एका तरुणाचा बाथरुममध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला. रोशन श्रीकृष्ण नान्हे (३०) रा. कोंढा असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
रोशन हा ग्रामपंचायत कोंढा येथे रोजगार सेवक म्हणून कार्यरत होता. त्याचे वडील श्रीकृष्ण नान्हे ग्रामपंचायत कोंढा येथे दीर्घकाळसेवा देऊन परिचर म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या मुलास रोजगार सेवक म्हणून नियुक्त केले होते. काही दिवसांपासून रोशनला लिव्हरचा आजार जडला होता. त्यावर औषधोपचार सुरू होते. काल घरच्या लोकांना ३० तारखेला वाढदिवस साजरा करण्याचे सांगितले होते. कुटुंबिय तयारीत व्यस्त होते. सर्वांनी मिळून आनंदात वाढदिवस साजरा करण्याचा प्लॅक करत होते. पण, आनंदाचा हा क्षण अचनाक दु:खात परिवर्तीत झाला.
बुधवारी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान रोशन लघुशंकेला गेला असता तिथेच चक्कर येऊन पडला. श्वास घेण्यास अडचण होत असल्याने डॉक्टरांना बोलावले. तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या मागे आईवडील, भाऊ, पत्नी, ४ वर्षे वयाचा मुलगा आणि ९ महिन्याची मुलगी आहे. कमावता मुलगा अचानक मृत्यू पावल्याने नान्हे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.