मोर्चावर सौम्य लाठीमार
By Admin | Updated: July 19, 2014 00:44 IST2014-07-19T00:44:16+5:302014-07-19T00:44:16+5:30
आदिवासी समाजावर सातत्याने होत असलेल्या

मोर्चावर सौम्य लाठीमार
दीड तास महामार्ग ठप्प : दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी
भंडारा : आदिवासी समाजावर सातत्याने होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आज आदिवासी बांधवांकरवी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा त्रिमुर्ती चौकात आल्यावर महामार्ग रोखून धरण्यात आला. दरम्यान, मोर्च्याला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यावेळी जमावातील एकाने दगड भिरकावल्याने व सुरक्षा कठडे पडल्यामुळे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले.
शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास शास्त्रीनगर चौकातून बी.एस. सय्याम यांच्या नेतृत्वात आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा काढण्यात आला. स्वातंत्र्याला ६५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला तरी आदिवासींच्या समस्या शासनाने गांभीर्याने घेतलेल्या नाहीत. आदिवासींच्या मागण्या पुर्ण झाल्या पाहिजेत या बाबीला अनुसरून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा व उपोषण करण्याचे ठरविण्यात आले. त्याअंतर्गत शहरातून भ्रमणकरीत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रिमुर्ती चौकात पोहोचला. पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्यामुळे चौकातच मोर्चा अडविण्यात आला. मात्र आंदोलकांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: घ्यावे, या मागणीला घेवून परिस्थिती चिघळत गेली. अखेर आदिवासी बांधवांचा संयमाचा बांध फुटला. सुरक्षा कठड्यांना धक्का मारून शेकडो आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले. याचवेळी जमावातील एकाने दगड भिरकावल्याने तो दगड पोलीस दलातील शिपाई हत्तीमारे यांच्या डोक्याला लागला. रक्त बंबाळ स्थितीत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. सुरक्षा कठडे कोसळल्यामुळे एक महिला पोलीस कर्मचारी रस्त्यावर कोसळली. यात तिलाही दुखापत झाली. सायंकाळी ४.१५ ते ५.२५ पर्यंत महामार्ग रोखून धरल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मोर्चेकरी महामार्गावरून हलत नसल्याचे जाणवल्यानंतर पोलिसांनी अखेर बळाचा वापर केला. सौम्य लाठीमार करत आंदोलकांना महामार्गावरून हिसकावून लावले. १० सेकंदात वाहतूक सुरू करण्यात आली. वारंवार विनंती करूनही आंदोलक रस्त्यावरून हटत नसल्यामुळे ही कारवाई केल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. यादरम्यान मोर्च्यातील शिष्टमंडळ सय्याम यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांच्याशी भेट घ्यायला गेले. यात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदनही सादर केले.
मागण्यांमध्ये २००८ पासून घरकुल बांधकामाचा निधी वाढवून देण्यात यावा, आदिवासींची नोकरी भरती कास्ट व्हॅलीडिटीशिवाय करू नये, वनकायद्याच्या अनुशंगाने आदिवासींच्या जमिनीचे पट्टे व सातबारा त्वरीत देण्यात यावा, लाखांदूर तालुक्यातील चिचगावमधील आदिवासी लोकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, धृ्रपता मसराम या महिलेचा गैरआदिवासींनी घराचे बांधकाम पाडले त्यांच्यावर अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, मुळ आदिवासींच्या जमिनीवर आदिवासींनी केलेले अतिक्रमण त्वरीत हटवावे आदी मागण्यांचा यात समावेश आहे. (प्रतिनिधी)