विदर्भ एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला, भंडारा जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 23:56 IST2021-05-18T23:55:16+5:302021-05-18T23:56:55+5:30
Vidarbha Express : इंजिन नजीकच्या डब्यांचे कपलिंग तुटल्याने भंडारा रोड रेल्वे स्टेशनवरुन निघाल्यानंतर एकलारी येथे या एक्सप्रेसला झटका बसला आणि दोन कोचमधील कपलिंग तुटून पडले.

विदर्भ एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला, भंडारा जिल्ह्यातील घटना
वरठी (भंडारा) : भंडारा रोड रेल्वे स्थानकावरुन नागपूरकडे जाणाऱ्या विदर्भ एक्सप्रेसचा मोठा अपघात मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास टळला. इंजिन नजीकच्या डब्यांचे कपलिंग तुटल्याने भंडारा रोड रेल्वे स्टेशनवरुन निघाल्यानंतर एकलारी येथे या एक्सप्रेसला झटका बसला आणि दोन कोचमधील कपलिंग तुटून पडले.
एक्सप्रेस ड्रायव्हर हे लक्षात येताच त्याने समय सुचकता दाखवत रेल्वे हळूहळू थांबवली. त्यामुळे डब्यांचाही वेग कमी झाला आणि थोड्या अंतरावर गाडी सुरक्षितपणे थांबली. एक्स्प्रेसचे डबे रेल्वे रुळांवरून घसरले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. मात्र, सुदैवाने ती टळली. पण या घटनेमुळे काही वेळ प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. रेल्वे लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे प्रशासन आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन इंजिनपासून दूर गेलेले डबे थोड्या वेळात जोडले. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
एक्सप्रेस ड्रायव्हर बी. के. वर्मा, गार्ड एस बी टेंबरे होते. यावेळी स्टेशन मास्टर मेघाय, रेल्वे पोलीस निरीक्षक एस दत्ता, उपनिरीक्षक दीपक कुमार, एएसआय वीणा औतकर यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.