नागपूर वनवृत्तात भंडाऱ्यात सर्वात कमी आगीच्या घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 05:00 IST2021-02-25T05:00:00+5:302021-02-25T05:00:57+5:30
भंडारा वनविभागात दहा वनक्षेत्र, ३८ सहवनक्षेत्र आणि १५६ बिटांची संख्या आहे. जिल्ह्यात राखीव वन ५४७.१२९ चौरस किमी., संरक्षित वन २७७.७६७ चौरस किमी., झुडूपी जंगल ९९.६५४ चौरस किमी. आणि अवर्गकृत क्षेत्र ४.५१७ चौरस किमी आहे. जंगलात बहुमूल्य वनसंपदा आणि विविध प्रकारचे पशुपक्षी आहेत. वनाचे रक्षण करण्यासाठी वनविभागाची यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहे. मात्र असले तरी जंगलात आगी लागण्याच्या घटना घडतात.

नागपूर वनवृत्तात भंडाऱ्यात सर्वात कमी आगीच्या घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कळत न कळत होणाऱ्या चुकांमुळे जंगलात वणवा लागतो. कोट्यवधीची बहुमूल्य वनसंपदा नष्ट होते. शेकडो पशुपक्षी आगीत होरपळून निघतात. हा प्रकार टाळण्यासाठी भंडारा वनविभागाने गत काही वर्षांपासून विशेष मोहीम हाती घेतली. त्यामुळेच नागपूर वनवृत्तात जिल्ह्यात सर्वात कमी आगीच्या घटना घडल्या. दरम्यान यावर्षीच्या वणवा हंगामाला प्रारंभ झाला असून जंगलातील फायरलाईनचे काम पूर्ण झाले आहे.
भंडारा वनविभागात दहा वनक्षेत्र, ३८ सहवनक्षेत्र आणि १५६ बिटांची संख्या आहे. जिल्ह्यात राखीव वन ५४७.१२९ चौरस किमी., संरक्षित वन २७७.७६७ चौरस किमी., झुडूपी जंगल ९९.६५४ चौरस किमी. आणि अवर्गकृत क्षेत्र ४.५१७ चौरस किमी आहे. जंगलात बहुमूल्य वनसंपदा आणि विविध प्रकारचे पशुपक्षी आहेत. वनाचे रक्षण करण्यासाठी वनविभागाची यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहे. मात्र असले तरी जंगलात आगी लागण्याच्या घटना घडतात. कृत्रिम वणवा लागून शेकडो हेक्टरवरील जंगल नष्ट होते. अनेक पशुपक्षी त्यात होरपळले जातात. मात्र भंडारा वनविभागाने वणवा नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबविली. त्यामुळेच गत काही वर्षात भंडारा जिल्ह्यातील जंगलात आगीच्या केवळ चार घटना घडल्या. या नागपूर वनवृत्तात सर्वात कमी आहे.
उन्हाळ्यात लागणाऱ्या वणव्यामुळे प्रचंड नुकसान होते. वनक्षेत्रालगत असलेल्या शेतांमध्ये कचरा पेटवून दिला जातो. त्यामुळे आग लागण्याची भीती असते.
जंगलातील मधमाश्यांचे पोळे काढण्यासाठी आग लावली जाते. मोहफूल गोळा करण्यासाठी परिसरातील केरकचरा जाळला जातो. तेंदूपत्ता संग्रहात सिमांकीत वाढ होण्यासाठी स्थानिकांकडून जाणीवपूर्वक वनक्षेत्रात आगी लावल्या जातात. तसेच जळती बिडी शिगारेट फेकल्यानेही आगी लागण्याची शक्यता असते. हा प्रकार टाळण्यासाठी भंडारा वनविभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे. वन कर्मचाऱ्यांना जागते रहो चे आदेश देण्यात आले आहे. १५ फेब्रुवारी ते १५ जून हा वणवा हंगाम असून तत्पूर्वी जंगलातील फायर लाईनचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
कृत्रिम वणवा लावल्यास कठोर कारवाई
राखीव वणात आग लावल्यास, विस्तोव पेटविल्यास लागलेल्या आग प्रकरणात संबंधितावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश भंडाराचे उपवनसंरक्षक एस.बी. भलावी यांनी दिले आहे. कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. कृत्रिम वणवा लावणाऱ्यास एक वर्षापर्यंत कारावास किंवा पाच हजार रुपयापर्यंत दंड किंवा दोनही शिक्षा ठोठावली जावू शकते.
वणव्याचे गांर्भीय लक्षात घेवून योजना कार्यांन्वीत केली आहे. कर्मचाऱ्यांना जागते रहोच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियंत्रणासाठी आवश्यक निर्देश दिले आहेत. वनक्षेत्राशी संबंधीत वनप्रेमी व नागरिकांनी आग लागल्याचे दिसताच तात्काळ नजीकच्या वनकर्मचाऱ्यांना माहिती द्यावी.
-शिवराम भलावी, उपवनसंक्षक भंडारा.