पूर्व विदर्भातील प्रकल्पांमध्ये अत्यल्प जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 12:43 IST2018-08-07T12:39:20+5:302018-08-07T12:43:10+5:30
पर्जन्यमानात आघाडीवर असणाऱ्या पूर्व विदर्भातील प्रकल्पांमध्ये यावर्षीच्या मान्सून सत्रात अत्यल्प पाणीसाठा आहे. एकट्या भंडारा जिल्ह्यात ६३ प्रकल्पांतर्गत ३६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

पूर्व विदर्भातील प्रकल्पांमध्ये अत्यल्प जलसाठा
लोकमत न्यूज नेटवर्क
इंद्रपाल कटकवार
भंडारा : पर्जन्यमानात आघाडीवर असणाऱ्या पूर्व विदर्भातील प्रकल्पांमध्ये यावर्षीच्या मान्सून सत्रात अत्यल्प पाणीसाठा आहे. एकट्या भंडारा जिल्ह्यात ६३ प्रकल्पांतर्गत ३६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. परिणामी पावसाने दगा दिल्यास नागरिकांसह शेतीलाही याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.
पूर्व विदर्भातील भंडारा व गोंदिया जिल्ह्यात तलावांची मोठी संख्या आहे. अडीच हजारांपेक्षा जास्त तलाव असले तरी त्यात माजी मालगुजारी तलावांची अवस्था हवी तेवढी चांगली नाही. पावसाळ्यात तलावांसह बोड्या व प्रकल्पांमध्ये पाणी साठवणूक होत असते. यावर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र, त्यानंतर ेपावसाने पाठ फिरविल्यामुळे प्रकल्पांमध्येही पाणी साठा होवू शकला नाही. भंडारा जिल्ह्यातील जीवनदायीनी समजल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीत मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात बरसणाऱ्या पावसाचे पाणी धरणांमार्फत सोडले जाते. यावर्षी मात्र तशी स्थिती ओढवली नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सरासरी १९ टक्के पाऊस कमी झाला.
भंडारा जिल्ह्यात ६३ प्रकल्प असून त्यात चार मध्यम प्रकल्प, ३१ लघु प्रकल्प तर २८ माजी मालगुजारी तलाव आहेत. हे सर्व प्रकल्प लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येत असून वन व अन्य विभागांच्या हद्दीत असलेल्या तलावांची संख्या वेगळी आहे.
पावसाने दगा दिल्यामुळे सद्यस्थितीत मध्यम प्रकल्पांमध्ये ३० टक्के तर लघु प्रकल्पात ३९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. दोन महिने पूर्ण झाल्यावरही जिल्ह्यातील प्रकल्पांनी निम्मी टक्केवारीही ओलांडलेली नाही. पाऊस नसल्यामुळे रोवणी व धान पीकाकरिता पहिल्यांदाच बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्यात येणार आहे.
धरणाची स्थितीही चिंताजनक
भंडारापेक्षा गोंदिया जिल्ह्यात धरणांची संख्या अधिक असली तरी दोन्ही जिल्ह्यात पर्जन्यमानाचे प्रमाण यावर्षी कमी आहे. परिणामी गोंदिया जिल्ह्यातील ईटियाडोह, सिरपूर, कालीसराड, धापेवाडा, वैनगंगा देवरी आदी धरण क्षेत्रात अपेक्षित जलसाठ्यापेक्षा पाण्याची टक्केवारी कमी आहे. याशिवाय मध्यप्रदेशातील संजय सरोवरात ४१० दलघमी जलसाठा अपेक्षित असताना आजघडीला फक्त १९८ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरणात ११४६ दलघमी जलसाठा अपेक्षित असताना १८८.०४ पाणीसाठा उपलब्ध आहे. या दोन्ही धरणांची टक्केवारी अनुक्रमे ४८ व २५ अशी आहे. सद्यस्थितीत भंडारा शहराच्या हाकेवर असलेल्या वैनगंगा नदीची पातळी ५.१७ मीटर इतकी आहे.