वैनगंगेच्या काठावरील मातीचे अवैध खनन

By Admin | Updated: March 2, 2017 00:15 IST2017-03-02T00:15:16+5:302017-03-02T00:15:16+5:30

जिल्ह्याला गौणखनिजांचे वरदान असताना तस्करांचीही तेवढीच मेहरनजर या गौणखनिजांवर आहे.

Illegal mining of soil on the banks of Wainganga | वैनगंगेच्या काठावरील मातीचे अवैध खनन

वैनगंगेच्या काठावरील मातीचे अवैध खनन

धुळीमुळे वायू प्रदूषणाचीही समस्या : सकाळी ६ वाजतापासून सुरू होते वाहतूक, लाखोंचा महसूल पाण्यात
भंडारा : जिल्ह्याला गौणखनिजांचे वरदान असताना तस्करांचीही तेवढीच मेहरनजर या गौणखनिजांवर आहे. भंडारा शहरालगत असलेल्या वैनगंगा नदी पात्राजवळील स्मशानभुमी परिसरातील सुपीक मातीची खुलेआम वाहतुक केली जात आहे. परिणामी शासनाचा लक्षावधी रूपयांचा महसूल बुडत आहे.
पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्याला सुपीक असा भुभाग लाभलेला आहे. गोसीखर्द धरणाच्या अस्तित्वानंतर जीवनदायिनी वैनगंगा नदीच्या भरोश्यावर बारमाही पिकेही घेतली जातात. वैनगंगा नदी भंडारा जिल्ह्याला वळसा घालुन वाहते.
नदी प्रवाहीत होत असताना एकीकडे वहन तर दुसऱ्या बाजुला संचयनाचे कार्य करित असते. त्यामुळे वैनगंगा नदीपात्रातही वाळूच्या रूपाने अमुल्य देणगी या जिल्ह्याला मिळाली आहे. संचयन कार्यामुळे तेवढीच सुपीक जमीनही नदीकाठावर आहे. परिणामी प्रचंड उत्पादन क्षमता असलेल्या व शासकीय मालमत्ता असलेल्या या जमीनीवरील मातीचे मोठ्या प्रमाणात खणन केले जात आहे. नदी काठावरील हिंदु स्मशानभूमी ते पश्चिम दिशेला जवळपास शंभर मीटर परिसरात तस्करांनी मातीचे खणन करायला सुरूवात केली आहे. यासाठी नदीकाठावर जाण्यासाठी कच्चा रस्ताही तयार करण्यात आला आहे. ट्रॅक्टर थेट नदीकाठापर्यंत नेण्यात येते. मजुरांच्या साह्याने नदीकाठावरील सुपीक मातीचे खणन करून ट्रॅक्टर टालीत भरण्यात येते. सकाळी ६ वाजतापासूनच या कामाला सुरूवात होते. महसूल प्रशासनासह खनिकर्म विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने तस्करांचे चांगलेच फावत आहे. माती घरबांधकामासाठी अथवा ले-आऊट समतल करण्यासाठी वापरली जात असल्याची माहिती आहे. फुकटच्या सुपीक मातीवर तस्कर लाखोंची कमाई करीत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Illegal mining of soil on the banks of Wainganga