सोशल मीडियावर गुंडागर्दी कराल तर जेलची हवा खावी लागणार !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 13:30 IST2024-05-25T13:29:58+5:302024-05-25T13:30:24+5:30
सोशल मीडियाचा वापर जपूनच करा : तलवारीने केक कापण्याचे प्रकार टाळा

If you commit crimes on social media, you will be in jail!
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अलीकडे समाज माध्यम प्रभावी ठरले आहे. सोशल मीडियावर लाइक्स, कमेंट मिळविण्याच्या नादात अनेकजण तलवारीने केक कापताना किंवा हातात शस्त्रास्त्रे घेऊन काढलेला व्हिडीओ अपलोड करतात. यामुळे समाजात विघातक प्रवृत्ती वाढीस लागते. त्यामुळे हा प्रकार अंगलट येऊ शकतो, असे व्हिडीओ टाकणाऱ्यांना प्रसंगी जेलची हवा खावी लागू शकते. सध्या सोशल मीडियावर लाइक्स व कमेंट मिळविण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. त्यासाठी अनेकजण विविध प्रकारचे फोटो, व्हिडीओ, रील्स शेअर करीत आहेत. मनोरंजन व विधायक कामांना प्रशंसाही मिळते; मात्र विघातक कृत्यांसाठी पोलिसांकडून धडक कारवाई केली जाऊ शकते.
पोलिसांकडून गय केली जात नाही
तलवारीने केक कापणे, कमरेला बंदूक लावणे, हाती उघडी तलवार घेऊन फिरणे, हे प्रकार कायद्याचा भंग करणारे आहेत. असे नियमबाह्य प्रकार करताना कुणी आढळल्यास त्याची गय केली जात नाही.
लाईक, शेअर कराल, तरीही अडचणीत याल
समाजात तेढ निर्माण होईल, असा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यास लाइक करणे किंवा पोस्ट शेअर करणाऱ्यांच्या विरोधातही कठोर कारवाई होऊ शकते.
तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट प्रसारित करू नयेत
• सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगल्या विचारांची देवाण-घेवाण होणे अपेक्षित आहे. समाजात तेढ निर्माण होईल, अशा प्रकारच्या पोस्ट प्रसारित करू नयेत, असे आवाहन सायबर पोलिसांकडून केले जात आहे.
भंडारा जिल्ह्यात काही गुन्हे दाखल
• सायबर पोलिसांकडून सोशल मीडियाचा चुकीच्या पद्धतीने वापर करणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
• समाजात तेढ निर्माण होईल, अशा पोस्ट प्रसारित केल्याप्रकरणी जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये काही गुन्हे दाखल झाले आहेत.
निवडणुकीच्या काळात विशेष लक्ष
• लोकसभा निवडणूकीत सोशल मीडियाचा कुणीही गैरवापर करू नये, यासाठी पोलिस दलाने अलर्ट मोडवर राहून काम केले. चुकीची विचारसरणी असणाऱ्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष होते.
सोशल माध्यमांचा योग्य वापर अनेकांचे जीवन बदलवू शकते, परंतु गैरवापर झाल्यास जेलची हवा खावी लागू शकते. समाजात द्वेष किंवा कुणाच्या भावना दुखावणार नाही, यासंबंधीही लक्ष दिले पाहिजे.
- सुबोध वंजारी, सहायक पोलिस निरीक्षक, भंडारा.