व्हाटसअॅपवर श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून 'त्याने' नदीत घेतली उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 17:11 IST2022-02-21T14:09:31+5:302022-02-21T17:11:10+5:30
अखिल भारतीय व्यवसाय शिक्षण मंडळातर्फे आयटीआयची परीक्षा घेत असून त्याचा निकाल शनिवारी जाहीर झाला; परंतु त्यात ताे अनुत्तीर्ण असल्याचे त्याला दिसून आले. त्यामुळे ताे प्रचंड मानसिक तणावात गेला.

व्हाटसअॅपवर श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून 'त्याने' नदीत घेतली उडी
तुमसर (भंडारा) : आयटीआयच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याचा मनावर आघात बसला. त्यामुळे आत्महत्येचा विचार मनात येऊन ‘रेस्ट इन पिस’ असे व्हाॅटसॲप स्टेटस ठेवून वैनगंगा नदीत उडी घेतली. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. मात्र, पाेलीस आणि बचाव पथकाने बराच वेळ शाेधाशाेध करूनही ताे गवसला नाही.
अनुराग विजय गायधने (वय १७, रा. तुमसर) असे या तरुणाचे नाव आहे. ताे बजाजनगर येथील न्यू तुलसी खासगी औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेत वीजतंत्रीचा विद्यार्थी हाेता. अखिल भारतीय व्यवसाय शिक्षण मंडळातर्फे आयटीआयची परीक्षा घेत असून त्याचा निकाल शनिवारी जाहीर झाला; परंतु त्यात ताे अनुत्तीर्ण असल्याचे त्याला दिसून आले. त्यामुळे ताे प्रचंड मानसिक तणावात गेला.
दरम्यान, ताे रविवारी पहाटेच्या सुमारास सायकलने वैनगंगा नदीपात्राजवळ आला. तत्पूर्वी, त्याने व्हाॅटसॲवर ‘श्रद्धांजली’चे स्टेटस ठेवले. नंतर अनुरागने वैनगंगा नदीत उडी मारल्याची शक्यता आहे. ही बाब कुटुंबीयांना माहिती हाेताच त्यांनी देव्हाडी पाेलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पाेलीस आणि शाेधपथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तब्बल सात-आठ तास शाेधमाेहीम राबविली; परंतु हा तरुण कुठेही आढळून आला नाही. या घटनेला पाेलीस उपनिरीक्षक गभणे यांनी दुजाेरा दिला आहे. तपासकार्य साेमवारीही राबविले जाणार आहे.