मानेगाव-पालांदूर राज्य महामार्गाची भीषण दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2016 00:22 IST2016-01-19T00:22:52+5:302016-01-19T00:22:52+5:30

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील लाखनी - मानेगाव (सडक) ते पालांदूर (चौ.) पर्यंतचा राज्य महामार्गाची परिस्थिती वाईट असून ..

The Great Depression of the Manenga-Palandur State Highway | मानेगाव-पालांदूर राज्य महामार्गाची भीषण दुर्दशा

मानेगाव-पालांदूर राज्य महामार्गाची भीषण दुर्दशा

जनता त्रस्त : पुलावरील कठडे गायब, पिचिंग व पॅचेस काम,
चंदन मोटघरे लाखनी
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील लाखनी - मानेगाव (सडक) ते पालांदूर (चौ.) पर्यंतचा राज्य महामार्गाची परिस्थिती वाईट असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित व कंत्राटदारांच्या खिसेभरू प्रवृत्तीमुळे रहदारीला अडचणी व अडथळे येत आहेत. राज्य महामार्गाची भीषण अवस्था असून रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. मार्गावरील पुलावर कठडे नसल्याने अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच सूचनांचे फलक नाही.
लाखनी - मानेगाव (सडक) ते पालांदूर (चौ.) हा २० कि.मी. चा मार्ग आहे. मानेगाव (सडक) ते पालांदूर (चौ.) हा १८ कि.मी. चा मार्ग राज्य महामार्ग म्हणून ओळखला जातो. सार्वजनिक बांधकाम विभाग साकोलीच्या द्वारे मानेगाव (सडक) ते पालांदूर (चौ.) रस्त्याचे डांबरीकरण, पॅचिंगची कामे, मोरी बांधकाम, नाल्यांची कामे केली जात असतात. मानेगाव (सडक) ते पालांदूर (चौ.) मार्ग कंत्राटदारांसाठी पैसे कमाविण्याचे माध्यम बनला असून वर्षभर रस्ता दुरुस्तीची कामे सुरु असतात.
तालुक्यातील पोहरा, कनेरी, जेवनाळा, पालांदूर (चौ.) ही मोठी गावे सदर मार्गावर आहेत. सानगडी, दिघोरी (मोठी), अड्याळ व पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी पालांदूर (चौ.) मार्गाचा वापर केला जातो. वाहतूक चोवीस तास सुरु असते. दळणवळणाच्या प्रमाणात रस्त्याची सुधारणा झाली नाही. मानेगाव ते पोहरा पेंढरी पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. पोहरा - पेंढरी - पालांदूर (चौ.) पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. बांधकाम विभाग रस्त्याचे रुंदीकरण सोडून रस्ता दुरुस्तीची कामे करीत असते. वाहतुकीचे प्रमाण वाढल्याने अरुंद रस्त्यामुळे अपघातांच्या घटनात वाढ होत आहे.
सध्या पालांदूर (चौ.) मार्गावर पॅचेसची कामे सुरु आहेत. या रस्त्यावर वर्षातून १२ वेळा दुरुस्तीची कामे करून कंत्राटदारांची व अधिकाऱ्यांचे खिसे भरले जातात. जिथे गरज नाही तिथे मोरी बांधकाम केले जाते. पॅचेसची कामे निकृष्ट असून खडी, चुरी, गिट्टी पसरलेली आहे. वेळोवेळी दुरुस्तीची कामे दाखवून शासनाच्या पैशाची विल्हेवाट लावली जात आहे. याकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहेत. पिचिंग व पॅचेसचे काम करतांना निकृष्ट चुनखडी, करडा मुरुम, काळ्या गिट्टीची चुरी, पिटखळी वापर करून निकृष्ट कामे केली जातात. अर्धवट काळा आॅईल वापरून डांबरींग, अपुरा रस्ता रुंदीकरण अशी वर्षातून सरासरी १२ वेळा म्हणजे वर्षभर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु असते.
भाजपा शासनाच्या कारकिर्दीत अभियंता व कंत्राटदारांना भीती राहिली नाही. यावरून स्थानिक लोकप्रतिनिधींकडून अशा लोकांना अभय दिले जात असल्याची चर्चा आहे.

पुलावर रेलिंग व कठड्यांचा अभाव
पालांदूर (चौ.) राज्य महामार्गावरील पोहरा येथील नाल्यावरील मोठ्या पुलावर कठडे व रेलिंग चोरीला गेले आहेत. जवळपास २० ते २५ वर्षापूर्वी पुलाचे काम झाले आहे. लोकांच्या सुरक्षिततेच्या सूचना नाही व कठडे नाहीत. यामुळे अपघाताची परिस्थिती निर्माण होवू शकते. जेवनाळा गावाजवळील पुलावर कठडे व रेलिंग नाहीत. तसेच इतर पुलांवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या नाहीत.
पेंढरी ते पालांदूर (चौ.) रस्ता रुंदीकरण
मानेगाव ते पालांदूर मार्गाला राज्य मार्गाचा दर्जा आहे. मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते. एक ट्रक किंवा बस रस्त्यावरून जाऊ शकते, एवढा निरुंद मार्ग आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाद्वारे रस्त्याचे हस्तांतरण राज्याकडे झाले आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. रस्त्यावरील अतिक्रमण काढल्याशिवाय रुंदीकरण अशक्य आहे. यासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक आहे. रहदारी वाढली परंतु त्या तुलनेत रस्त्याचे रुंदीकरणही महत्वाचे आहे. अन्यथा अपघाताच्या घटनात वाढ होईल. मानेगाव ते पालांदूर मार्गावरील सलगच्या १०० गावांच्या लोकांचा संपर्क येत असतो. साकोली - लाखनी - लाखांदूर - पवनी तालुक्याच्या सीमारेखा पालांदूरजवळ आहेत. व्यापाऱ्यांच्या व दळणवळणाच्या दृष्टीने पालांदूर महत्वाचे केंद्र आहे.

मानेगाव पालांदूर मार्गाचे रुंदीकरण महत्वाचे आहे. रस्त्याची कामे निकृष्ट प्रतीचे होत असल्याने जनतेला त्रास सहन करावा लागतो. वाढत्या रहदारीच्या दृष्टीने रस्त्याचा विकास व सोयी सुविधेत वाढ होणे आवश्यक आहे.
-विनायक बुरडे
जि.प. सभापती, भंडारा.

Web Title: The Great Depression of the Manenga-Palandur State Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.