शाश्वत विकासासाठी शासन कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:15 IST2018-01-28T00:14:57+5:302018-01-28T00:15:22+5:30
मागील तीन वर्षात प्रशासनाने जिल्हा विकासाच्या विविध योजना यशस्वी राबविण्यात येत आहे.

शाश्वत विकासासाठी शासन कटिबद्ध
आॅनलाईन लोकमत
भंडारा : मागील तीन वर्षात प्रशासनाने जिल्हा विकासाच्या विविध योजना यशस्वी राबविण्यात येत आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी समतोल शाश्वत विकास, दरडोई उत्पन्नात वाढ करणे, क्षमतावर्धन, जल, जंगल आणि जमीन संवर्धन, भाजीपाला क्लस्टर, पुरवठा साखळी, कृषी प्रक्रिया उद्योग, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, रेशीम विकास, पुनर्भरण प्रकल्प यावर आधारित जिल्ह्याचा विकास करण्याचा संकल्प आहे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केले.
पोलीस कवायत मैदानावर आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारोहात ते बोलत होते. यावेळी ना.महादेव जानकर यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, आमदार रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकूमार सूर्यवंशी, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवीशेख्रर धकाते, अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत जिल्ह्यातील जिल्हा बँकेने ४२ हजार ५०५ शेतकरी सभासदांना ९२ कोटी ४४ लाख रूपयांचा लाभ दिला. राष्ट्रीयकृत बँक, ग्रामीण बँक व खाजगी बँकेने सहा हजार ७५८ शेतकरी सभासदांना ५० कोटी ९ लाख रकमेचा लाभ दिला आहे. पात्र शेतकºयांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षात २०१ गावांची निवड करण्यात आली. सर्व यंत्रणांनी केलेल्या कामामुळे २७ हजार २०० हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. जलयुक्त शिवार अभियानात भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या माध्यमातून १० गावामध्ये पुनर्भरणाच्या ५० योजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. यावर्षी १७ गावांमध्ये ९५ योजना प्रस्तावित करण्यात आल्या असून याद्वारे भूजल पातळी वाढविली जाणार आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता मिशनमार्फत ५६ हजार ९१८ वैयक्तिक शौचालय बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. पायाभूत सर्वेक्षणानुसार मागील तीन वर्षात राबविलेल्या ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानामुळे जिल्हा हागणदारीमुक्त झाला आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात जे ११ जिल्हे हागणदारीमुक्त झाले त्यात भंडारा जिल्ह्याचा समावेश आहे.
गोसेखुर्द प्रकल्पातील १२८ गावातील एकूण ११ हजार ७९१ लाभार्थ्यांना ३५३ कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले. गोसेखुर्द प्रकल्पबाधीत ६४१ पात्र कुटूंबापैकी ५७० खातेदारांना १८ कोटी ५९ लाखाचे विशेष पॅकेज अंतर्गत वाटप करण्यात आले.
भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जलसाठयाचा उपयोग मत्स्य व्यवसायासाठी करण्यात येत आहे. मत्स्यजीरे उत्पादनात जिल्हा राज्यात अग्रेसर असून यावर्षी मच्छीमार सहकारी संस्था आणि शिवणीबांध येथील मत्स्यबीज उत्पादन केंद्राद्वारे डिसेंबरअखेर १३.९३ कोटी मत्स्यजीरे निर्मिती केली आहे. मत्स्य व्यवसायात रोजगाराच्या खूप संधी आहेत. यासाठी प्रशासन नियोजन करीत आहे.
यावेळी पोलीस प्रशासनाकडून मानवंदना देण्यात आली. यावेळी प्राविण्यप्राप्त अधिकारी, कर्मचारी, खेळाडू व विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विविध विभागाने तयार केलेल्या चित्ररथांचा पथसंचलनात सहभाग होता.
शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर केला. यावेळी स्वातंत्र्यसैनिक, नागरिक अधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमाचे संचलन स्मिता गालफाडे, मुकूंद ठवकर यांनी केले.