गस्तीवरील तलाठ्याला तस्करांची मारहाण
By Admin | Updated: December 7, 2014 22:44 IST2014-12-07T22:44:42+5:302014-12-07T22:44:42+5:30
रेतीची अवैध वाहतुक करणारे ट्रॅक्टर तलाठ्याने पकडले. यामुळे संतप्त रेती तस्करांनी तलाठ्याला मारहाण केली. ही घटना शनिवारी पवनी तालुक्यातील पालोरा (चौ.) येथे घडली. याप्रकरणी अड्याळ

गस्तीवरील तलाठ्याला तस्करांची मारहाण
पालोरा (चौ) : रेतीची अवैध वाहतुक करणारे ट्रॅक्टर तलाठ्याने पकडले. यामुळे संतप्त रेती तस्करांनी तलाठ्याला मारहाण केली. ही घटना शनिवारी पवनी तालुक्यातील पालोरा (चौ.) येथे घडली. याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
पवनी तालुक्यातील महसुल विभागाचे तलाठी कुंभारे, मोटघरे हे पथकासह गस्तीवर होते. सकाळी ७ वाजताच्या सुमारास पालोरा-लोणारा फाट्यावर त्यांना रेती भरलेले दोन ट्रॅक्टर दिसले. कुंभारे यांनी ट्रॅक्टर थांबवून चालकाला रेतीचा परवाना विचारला असता चालकाने परवाना नसल्याचे सांगितले.
त्यानंतर ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई करण्यात आली. यावेळी ट्रॅक्टर चालकांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. वाद वाढल्याने प्रकरण हातापाईवर पोहोचले. दरम्यान तलाठी कुंभारे यांना मारहाण केली. ही बाब ट्रॅक्टर मालकांना माहित होताच ते भंडारा, अड्याळ व पवनी येथून चारचाकी वाहनाने घटनास्थळावर पोहचले. त्यांनी तलाठ्याला मारहाण केली. याप्रकरणी तलाठी कुंभारे यांच्या तक्रारीवरून अड्याळ पोलिसांनी भादंवि ३५३, १८६, ३३२, १४३, २९४, ५०६ कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.
याप्रकरणी किशारे पंचभाई (३०), परेश पंचभाई (३५) रा. येनोळा, जितेंद्र नखाते (२८) रा. मोखारा, इलीयाज शेख (३२) रा. अड्याळ, महेंद्र जिभकाटे (३८) रा. कोसरा, ऋषी जांभुळे (३५) रा. वडेगाव यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर जामिनावर सुटका करण्यात आली. (वार्ताहर)