भंडाऱ्यातील रस्त्यांसाठी १० कोटींचा निधी मंजूर, बांधकाम मात्र अर्धवट ! दोन वर्षांपासून नागरिकांचे होताहेत हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 17:12 IST2025-10-14T17:10:24+5:302025-10-14T17:12:58+5:30
बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : वाहनचालक हैराण, खडकी-ढिवरवाडा अर्धवट रस्त्याचे प्रकरण

Funds of Rs 10 crore approved for roads in Bhandara, but construction is only half done! Citizens have been suffering for two years
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा मुख्यालयाला जोडणाऱ्या भंडारा ते खडकी मार्गावरील खडकी ते ढिवरवाडा दरम्यानच्या मातीमोल झालेल्या रस्त्याच्या बांधकामासाठी दोन वर्षापूर्वी माजी सरपंच धामदेव वनवे यांनी नागरिकांच्या मदतीने दोनदा रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी आमदार राजू कारेमोरे यांच्या मध्यस्थीने शासनाने १० कोटींचा निधी मंजूर केला. मात्र, मोहाडी राज्य बांधकाम विभागाने या रस्त्याचे कंत्राट भंडारा उपविभागाकडून हिसकावून घेतले. दीड वर्षापूर्वी रस्त्याचे बांधकाम संथगतीने सुरू झाले. अद्यापही रस्त्याचे केवळ २५ टक्के बांधकाम झाले आहे. परिणामी, निधी मंजूर होऊनही नागरिकांना दोन फूट खोल खड्ड्यांतून प्रवास करावा लागत आहे.
राज्य सार्वजनिक बांधकाम उपविभाग, मोहाडी यांच्यामार्फत जानेवारी २०२५ मध्ये खडकी ते ढिवरवाडा रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र, बांधकाम विभाग व कंत्राटदाराच्या संगनमताने रस्त्याचे काम अद्यापही संथगतीने सुरू होते. पावसाळ्यापासून बांधकाम बंद अवस्थेत आहे. रस्त्यावरील वर्दळ व पावसाच्या तडाख्याने लाखो रुपये खर्च करून तयार झालेला रस्ता उखडला आहे. निकृष्ट बांधकामाचा फटका वाहनचालकांना बसत आहे. रस्त्यावर दोन फुटांपर्यंत खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची गैरसोय वाढली आहे. अपघाताचा धोका निर्माण झाला असून वाहतुकीची गती मंदावली आहे.
खड्ड्यांची दुरुस्तीही थातूरमातूर
वाहतूकदारांची ओरड वाढीस लागताच दोन दिवसांपूर्वी कंत्राटदाराच्या वतीने खोल खड्डे बुजविण्याला प्रारंभ करण्यात आला. परंतु, कामांचा दर्जा राखला जात नाही. शिवाय एक ट्रक मुरूमात खड्डे बुजविण्याचा पराक्रम विभागाकडून केला जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणी तातडीने लक्ष घालावे.
१५ अन्यथा दिवसांनंतर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
ढिवरवाडा ते खडकीपर्यंतच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. बांधकाम विभागाने तातडीने सुधारणा करावी. वाहतुकदारांचा जीव वाचवावा अशी अपेक्षा आहे.
निकृष्ट दर्जामुळे अल्पावधीत धिंडवडे
रस्ता बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने निकृष्ट साहित्य वापरल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. थातूरमातूर झालेल्या कामांमुळे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच यंदाच्या पावसाने रस्त्याचे धिंडवडे काढले. खड्ड्यांत साचलेल्या पाण्यामुळे बांधकामाची पोलखोल झाली. खड्यांचा अंदाज येत नसल्याने प्रवास धोकादायक बनला असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
"खडकी ते ढिवरवाडा रस्ता बांधकामात राज्य बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. दीड वर्षानंतरही बांधकाम अपूर्ण आहे. वाहतूकदारांना अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे. वरिष्ठांनी लक्ष न घातल्यास १५ दिवसांनंतर तीव्र आंदोलन केले जाईल."
- धामदेव वनवे, माजी सरपंच, ढिवरवाडा.