सततच्या भारनियमनामुळे पीकं संकटात; संतप्त शेतकऱ्यांचे आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 15:19 IST2022-04-11T14:55:09+5:302022-04-11T15:19:47+5:30
संतप्त शेतकऱ्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे निवासस्थानासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत महावितरण लिखित स्वरूपात आश्वासन देत नाही तोपर्यंत येथेच भोजन बनवून ठिय्या मांडण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला.

सततच्या भारनियमनामुळे पीकं संकटात; संतप्त शेतकऱ्यांचे आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन
साकोली (भंडारा) : अतिरिक्त भारनियमन बंद करून आठ तास शेतातील वीजपुरवठा नियमित सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी बारव्हा, जैतपूर, खोलमारा, तावशी, साखरा व चिकना येथील जवळपास २०० शेतकऱ्यांनी आमदारनाना पटोले यांच्या निवासस्थानी सुकळी येथे ठिय्या आंदोलन केले.
सहा दिवसांपासून अतिरिक्त भारनियमनाच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी परिसरातील अनेक गावांत एक तासही ओलीत पिकांना मिळत नसल्याने पीक उन्हाने वाळत चालले आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदारनाना पटोले यांचे निवासस्थानासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत महावितरण लिखित स्वरूपात आश्वासन देत नाही तोपर्यंत येथेच भोजन बनवून ठिय्या मांडण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला.
महावितरण अधिकारी यांना संपर्क करीत आमदार पटोले यांचे स्वीय सहायक यांनी आंदोलनकर्त्यांसमोर अभियंता यांना फोन लावला, पण महावितरण अधिकारी जोपर्यंत येथे येऊन अखंडित आठ तास वीजपुरवठा लिखित देत नाही तोपर्यंत न उठण्याचा पवित्रा घेऊन येथे संतापजनक मुद्रेत होते. भारनियमाला त्रासून कृष्णा शालिक अतकरी यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे शासन शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची वाट पाहत आहे काय, असा प्रश्न महावितरणला केला. ताबडतोब नियमित ८ तास वीजपुरवठा सुरू करा, अन्यथा गंभीर परिणामास महावितरण जबाबदार राहणार असा पवित्रा येथे सुरू आहे. यावेळी चंद्रशेखर टेंभुर्णे यांचे नेतृत्वात गोपाल झोडे, पतिराम झोडे, निलकंठ चौधरी, रवी सोनवाने यांच्यासह जैतपूर, खोलमारा, तावशी, साखरा, बारव्हा व चिकना येथील शेतकरी उपस्थित होते.