परीक्षा वेळापत्रक व निकाल एसएमएसवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 05:00 IST2020-03-12T05:00:00+5:302020-03-12T05:00:14+5:30

निकाल लागल्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी केवळ सात दिवसाची मुदत असते. अनेकांना निकालाचीच माहिती नसते. त्यामुळे अनेक विद्यार्थी पुनर्मूल्यांकनाच्या सुविधेपासून वंचित राहतात. अनेक विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान होते. संबंधित महाविद्यालय सुद्धा त्यांना योग्य व पुरेशी माहिती देत नाही. अशा विद्यार्थ्यांना या एसएमएस सेवेचा लाभ होणार आहे.

Exam Schedule and Results on SMS | परीक्षा वेळापत्रक व निकाल एसएमएसवर

परीक्षा वेळापत्रक व निकाल एसएमएसवर

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे परीक्षा वेळापत्रक आणि निकालाची माहिती आता एसएसएमद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या संदर्भात सिनेटच्या सभेत प्रस्ताव मंजूर करण्यात आला. याचा फायदा भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना होणार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे हिवाळी सत्रात एक हजार तर उन्हाळी सत्रात १२५० परीक्षांचे आयोजन करीत असते. सत्रांत परीक्षांमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. परीक्षेत नापास विद्यार्थ्यांना दोन ते तीन परीक्षांचा सामना करावा लागतो. इंटरनेटची सुविधा नसलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो.त्यामुळे या परीक्षेसंदर्भातील माहिती मोबाईल, एसएमएसद्वारे द्यावी असा ठराव सीनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांनी विद्यापीठाच्या बैठकीत मांडला. त्याला सभागृहातील सर्व सदस्यांनी समर्थन देत मंजुरी दिली. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवरच परीक्षेचे वेळापत्रक व निकालाची माहितीही मिळणार आहे.
निकाल लागल्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी केवळ सात दिवसाची मुदत असते. अनेकांना निकालाचीच माहिती नसते. त्यामुळे अनेक विद्यार्थी पुनर्मूल्यांकनाच्या सुविधेपासून वंचित राहतात. अनेक विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान होते. संबंधित महाविद्यालय सुद्धा त्यांना योग्य व पुरेशी माहिती देत नाही. अशा विद्यार्थ्यांना या एसएमएस सेवेचा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे निकालाची सूचना न मिळाल्याने परीक्षेचा अर्ज भरताना अनेकदा भुर्दंड अनेकांना सोसावा लागतो. एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त विलंब झाल्यास १५०० ते १४००० रुपयापर्यंत विलंब शुल्क भरण्याची वेळ अनेक विद्यार्थ्यांवर येते. त्यामुळे विद्यापीठाच्या उत्पन्नात भर पडत असली तरी विद्यार्थ्यांना मात्र त्याचा मोठा फटका बसतो. आता ही आर्थिक लूटही थांबणार असल्याचे प्रवीण उदापुरे यांनी सांगितले.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यापीठात मोठे बदल करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. विद्यार्थ्यांसाठी एसएमएसची सुविधा उपलब्ध झाल्याने मोठा फायदा होणार आहे. उत्तरपत्रिका वेबसाईटवर उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
-प्रवीण उदापुरे,
सिनेट सदस्य, नागपूर विद्यापीठ

Web Title: Exam Schedule and Results on SMS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.