इकॉर्नियाचे निर्मूलन!; शुद्धीकरणाचे काय?
By Admin | Updated: June 13, 2016 01:55 IST2016-06-13T01:55:09+5:302016-06-13T01:55:09+5:30
वैनगंगेच्या दूषित पाण्यामुळे भंडाराकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागनदीचे घाण पाणी आणि जलपर्णी वनस्पती (इकॉर्निया) यामुळे ....

इकॉर्नियाचे निर्मूलन!; शुद्धीकरणाचे काय?
योजना अजूनही अधांतरी
दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात
भंडारा : वैनगंगेच्या दूषित पाण्यामुळे भंडाराकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागनदीचे घाण पाणी आणि जलपर्णी वनस्पती (इकॉर्निया) यामुळे
वैनगंगेचे पाणी दूषित झाले आहे. या पार्श्वभूमीवर नदीपात्रातून ही वनस्पती काढण्याचे काम प्रशासनाकडून अधुनमधुन सुरू असले तरी पाण्याच्या शुद्धीकरणाबाबत ठोस उपयायोजना अद्यापही नाही.
केंद्र शासनाने नदी शुध्दीकरणाचा नारा दिला असला तरी आजपर्यत कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हावासीयांना अद्यापही ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात गोसीखुर्द येथे वैनगंगा नदीवर धरण बांधले आहे. त्यामध्ये पाणी साठविणे सुरु असल्याने पाणी सिंचीत राहू लागले आहे. नागपुरातून वाहत येणाऱ्या नागनदीचे घाण पाणी आंभोरा घाटावर वैनगंगा नदीत मिसळते. हेच पाणी गोसे धरणात जाते.
नागनदी ही नागपुरातून उगम पावली असून सांडपाणी नागनदीच्या पात्रात सोडण्यात येते. नागपुरातील विविध केमीकल कंपन्यांचे वेस्टेज रासायनिक पाणी नागनदीतून वाहत जाऊन वैनगंगेत मिसळते. त्यामुळे गोसे धरणातील संपूर्ण जलसाठा दूषित झाला आहे. धरणात पाणी अडविल्यामुळे गोसेखुर्द पासून सुमारे तीस पस्तीस किलोमिटर भंडारा - कारधा पर्यंत वैनगंगा नदी पाण्याने भरली आहे. नागनदीचे पाणी मिसळल्यामुळे पाणी दूषित झाले असून पाण्यातून दुर्गंधी येत आहे. पाण्याचा रंग हिरवट काळसर झाला आहे. पवनी व भंडारा येथे नगरपरिषद द्वारा लोकांना पिण्याचे पाण्याचा पुरवठा वैनगंगा नदीतूनच केला जातो. फिल्टर करून पाणी दिल्या जाते तरी पाणी पिताना पाण्याचा वेगळाच वास येतो. एकंदरीत या दूषित पाण्यामुळे लोकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही प्रकारचा रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीकाठावर बरेच गावे आहेत.
तेथील स्त्री पुरुष नदीच्या पाण्यात आंघोळ करतात. त्या दूषित पाण्यामुळे काही लोकांच्या अंगाला खाज सुटणे, अंगावर लालसर चट्टे येणे आदी प्रकार दिसून येत आहेत. ग्रामपंचायतमार्फत याच नदीतील पाणी गावातील लोकांना पिण्यासाठी पुरविले जाते. फिल्टरची खास सोय नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना या दूषित पाण्यापासून फारच धोका निर्माण झाला आहे.
सबब नदीकाठावरील गावचे लोक या दूषित पाण्यामुळे त्रस्त झाले असून प्रत्येक माणसाचे मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पवनी परिसरात कावीळ रोगाचा प्रादूर्भाव जास्त प्रमाणात दिसत आहे. वैनगंगेचे पाणी दूषित होण्याचे प्रमुख कारण म्हणजे नागपूर शहरातून वाहत येणाऱ्या नाग नदीचे घाण व रासायनिक पाणी होय. सबब वैनगंगेच्या पाण्यात नाग नदीचे दूषित घाण पाणी जाऊ न देण्याची खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण नागरिकांच्या आरोग्यास दिवसेंदिवस रोगराईचा धोका निर्माण होत आाहे.
संपूर्ण नदी पात्रातील साचलेले पाणी दूषित झाल्यामुळे मासोळ्यांचे उत्पादनसुद्धा मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे नदी काठावरील ढिवर समाजाचे रोजगारावर गंभीर परिणाम झाला आहे. नाग नदीचे घाण पाणी वैनगंगेच्या पाण्यात जाऊ न देण्यासंबंधाने शासन स्तरावरून योग्य ती कारवाई तातडीने सुरु करावी. नाग नदीचे घाण पाणी वैनगंगा नदीच्या पाण्यात जावू न देता ते पाणी शुद्ध करण्याची गरज आहे. याबाबत निरी संस्थेनेही पुढाकार घेण्याबाबत संमती दिल्याचे समजते. इकॉर्नियाचे निर्मूलन होत असले तरी पाणी शुद्धीकरण होणे गरजेचे आहे.
(नगर प्रतिनिधी)
उपाययोजना कागदावर
नदीत येणारे नागनदीचे दुषित पाणी स्वच्छ करण्याविषयी वर्षभरापासून लोकनेत्यांकडून मागणी करण्यात येत आहे. तर अधिकाऱ्यांकडून पाणी बचतीसह उपाययोजना कागदावरच आहेत. यापुर्वी पाच नद्यांच्या पाण्याचे पूजन करुन ते पाणी सोडण्यात आले होते. मात्र नदी शुध्द झाली नाही. नागरिकांना आजही अशुध्द पाणी प्यावे लागत आहे.