मराठी न शिकविणाऱ्या इंग्रजी शाळांना होणार एक लाखाचा दंड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 05:00 IST2021-11-20T05:00:00+5:302021-11-20T05:00:29+5:30
शासन स्तरावरून याबाबतचा वारंवार आढावा घेतला जात आहे. त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रातील मराठी भाषेचे अध्ययन व अध्यापन सक्तीबाबत अधिनियम २०२० अंतर्गत सक्तीचा विषय म्हणून शिकवत नसलेल्या शाळांवर अधिनियमांतील कलम (१२) नुसार कारवाई करण्यात आली पाहिजे. महाराष्ट्र राज्याची राजभाषा मराठी असतानाही इंग्रजी शाळांकडून होणारी अवहेलना हा चिंतेचा विषय आहे. मात्र तरीही प्रशासनाकडून कारवाई होत नाही.

मराठी न शिकविणाऱ्या इंग्रजी शाळांना होणार एक लाखाचा दंड!
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्यातील सर्व शाळांमध्येमराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने १६ नोव्हेंबरला एक पत्र काढून अधिनियम २०२० अंतर्गत सक्तीचा विषय म्हणून मराठी शिकवत नसलेल्या शाळांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यासाठी ९ मार्च २०२० शासन अधिसूचना काढून मराठी विषय न शिकविणाऱ्या राज्यातील इयत्ता १ ली ते इयत्ता १० वीसाठी मराठी भाषा सक्तीचे अध्यापन व अध्ययन शैक्षणिक वर्ष सन २०२०-२२ पासून सुरू करण्यात आले आहे.
शासन स्तरावरून याबाबतचा वारंवार आढावा घेतला जात आहे. त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रातील मराठी भाषेचे अध्ययन व अध्यापन सक्तीबाबत अधिनियम २०२० अंतर्गत सक्तीचा विषय म्हणून शिकवत नसलेल्या शाळांवर अधिनियमांतील कलम (१२) नुसार कारवाई करण्यात आली पाहिजे. महाराष्ट्र राज्याची राजभाषा मराठी असतानाही इंग्रजी शाळांकडून होणारी अवहेलना हा चिंतेचा विषय आहे. मात्र तरीही प्रशासनाकडून कारवाई होत नाही.
मराठी शिकविणे आवश्यक
आपली मातृभाषा मराठी असल्यामुळे इंग्रजी शाळांमध्येही मराठी विषय शिकविणे अत्यावश्यक आहे. परंतु मराठीकडे सपशेल दुर्लक्ष करणाऱ्या शाळांवर आता कारवाईचा बडगा आल्याने मराठी विषय शिकवायला सुरूवात केली आहे. शाळांवर १ लाख रुपयांपर्यंतचा दंड व होणारी बदनामी पाहून मराठी विषय शिकवायला सुरुवात केली आहे.
एक लाखापर्यंतचा दंड
- इंग्रजी शाळांमध्ये मराठी विषय शिकविला गेला नाही तर त्या शाळांवर १ लाख रुपयांपर्यंतचा दंड केला जाणार आहे. त्यामुळे दंडाला सामोरे जाऊ नये म्हणून आता इंग्रजी माध्यमाच्या शाळा मराठी विषय शिकवतील अशी आशा आहे. अनेक इंग्रजी शाळेत मराठी विषय शिकविला जात नाही.
मराठी शिकवली जात नसल्यास करा तक्रार
- आपला पाल्य ज्या शाळेत शिक्षण घेत असेल त्या शाळेत इयत्ता १० वीपर्यंत मराठी विषय शिकविला जात नसेल तर त्या शाळांची तक्रार पालकांनी गटशिक्षणाधिकारी तसेच शिक्षणाधिकारी यांच्याकडे करायला हवी. जेणेकरून आपल्या मुलाला मराठी विषय शिकवावा.
इंग्रजी शाळेतील मुले मराठीत ‘ढ’
आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत इंग्रजीतून शिक्षण दिले जाते खरे; परंतु त्यांना मातृभाषेपासून दूर ठेवले जात असल्याने मराठीचे शिक्षण न देणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश शिक्षण संचालकांनी काढला आहे. त्यामुळे इंग्रजी शाळेत मराठी शिकविले जात नाही, त्या शाळांवर कारवाई करण्याची गरज आहे.
- श्वेता मेश्राम, पालक, भंडारा
इंग्रजीत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे मराठी भाषेपासून दुरावले जात आहेत. याची अनेक उदाहरणे आपल्या आसपास आहेत. आपल्या राज्यात मराठी, हिंदी, इंग्रजी व्यवहारासाठी आवश्वक भाषा असल्याने मातृभाषा म्हणून मराठी विषयाला इंग्रजी शाळेतही प्राध्यान्य देण्याची गरज आहे. पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई हवी.
- संगिता गिऱ्हेपुंजे, पालक.
आपला मुलगा, मुलगी ज्या शाळेत शिक्षण घेतात त्या शाळेत १० वीपर्यंत मराठी विषय शिकविला गेलाच पाहिजे. जर असे होत नसेल तर त्या शाळेत प्रवेश घेतानाच पालकांनी विचार करण्याची गरज आहे. आज अनेक साहित्यीक अनेक मोठे अधिकारी मराठी शाळेतूनच शिकून मोठे झाले आहेत. पालकांनी सर्व पालकांनी मराठी शाळेतच पाल्यांना शिकविले पाहिजेत.
- मनोज केवट, कवी, भंडारा