आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 15:04 IST2025-11-02T15:03:47+5:302025-11-02T15:04:06+5:30
शिशुपाल गोपाले यांनी तिथे येऊन मुंगुसमारे यांच्याशी वाद घातला. शिवीगाळ सुरू केली.

आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
भंडारा : तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आष्टी येथे आर्थिक व्यवहारावरून झालेल्या वादात राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते असलेले माजी उपसभापती शिशुपाल गोपाले यांनी अलिकडेच शिंदे सेनेत प्रवेश केलेले ठाकचंद मुंगूसमारे यांच्यावर बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी गोबरवाही पोलिसांनी मुंगुसमारे यांच्या तक्रारीवरून शिशुपाल गोपाले यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना शनिवारी (१ नोव्हेंबर) रात्री १२ वाजताच्या सुमारास आष्टी गावातील ठाकचंद मुंगूसमारे यांच्या धान गोडाऊन मध्ये घडली. शिशुपाल गोपाले यांनी तिथे येऊन मुंगुसमारे यांच्याशी वाद घातला. शिवीगाळ सुरू केली. यामुळे ठाकचंद मुंगूसमारे तसेच अजय गहाणे यांनी विचारणा केली असता बाहेर येऊन गोपाले यांनी आपल्या उभ्या असलेल्या बलेनो वाहनातून (एमएच ३६ / एएल २३९२) बंदूक आणली. त्या दोघांवरही रोखून धरली व ठार मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार पोलिसात नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणी अजय गहाणे यांनी गोबरवाही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून शिशुपाल गोपाले यांच्याविरूद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२, ३५१, ३२९ नुसार तसेच व शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्ह्याची नोंद घेण्यात आली. ठाणेदार शरद शेवाळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अजय रोडे पुढील तपास करीत आहे. ही बंदूक छर्राची होती त्यामुळे परवानाची गरज नसल्याचे सांगण्यात आले.
दोघांचीही होती भागीदारी
मिळालेल्या माहितीनुसार शिशुपाल गोपाले आणि ठाकचंद मुंगूसमारे या दोघांमध्ये धान, रेती व इतर व्यवसायात भागीदारी होती. दोघेही पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजीत पवार गट) होते. मुंगुसमारे हे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदावर होते. तर, गोपाले हे तुमसर पंचायत समितीचे माजी उपसभापती आहेत. गेल्या महिनाभरापूर्वी मुंगुसमारे हे शिंदेसेनेमध्ये प्रवेशले होते. अलिकडे, या दोघांमध्ये वाद सुरू होता. या वादामागे रेती व धान सहकाराची बाब असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगली आहे.