वैनगंगेत आढळला दिलीप बावणकरांचा मृतदेह पण मृत्यूचे गूढ कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 12:47 IST2025-11-08T12:46:08+5:302025-11-08T12:47:01+5:30
Bhandara : जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष दिलीप पमाजी बावनकर (५८, विदर्भगृहनिर्माण सोसायटी, तकिया वॉर्ड, भंडारा) यांचा मृतदेह अखेर गुरुवारी रात्री उशिरा वैनगंगा नदीपात्रात मोठ्या पुलालगत काही अंतरावर आढळला.

Dilip Bawankar's body found in Waingangane but the mystery of his death remains
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष दिलीप पमाजी बावनकर (५८, विदर्भगृहनिर्माण सोसायटी, तकिया वॉर्ड, भंडारा) यांचा मृतदेह अखेर गुरुवारी रात्री उशिरा वैनगंगा नदीपात्रात मोठ्या पुलालगत काही अंतरावर आढळला. त्यांनी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले असले तरी, त्यांच्या आत्महत्येमागील गूढ मात्र कायमच आहे.
दिलीप बावनकर हे बुधवार, ५ नोव्हेंबरच्या रात्री ८:३० वाजेपासून गायब होते. घरी आयोजित केलेले तुलसी विवाह समारंभानंतर ते अचानकपणे घरून दुचाकीवरून बाहेर पडले. त्यानंतर, त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार कुटुंबीयांनी रात्रीच ९ वाजता पोलिसांत नोंदविली होती. पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली. वैनगंगा नदीवरील कारधा येथील जुन्या पुलावर त्याची चप्पल आणि सायकल आढळल्यानंतर, भंडारा पोलिसांनी एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) आणि स्थानिक मच्छीमारांच्या १० सदस्यांच्या पथकाच्या मदतीने गुरुवारी, ६ नोव्हेंबरला सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत नदीच्या पात्रात शोध घेतला, परंतु ते सापडले नाही. दरम्यान, गुरुवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास भंडारा शहराकडे जाणाऱ्या मुख्य पुलाजवळ नदीत एक मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वाखालील बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह रात्री १० वाजेच्या सुमारास बाहेर काढला.
निरोप घेऊन पडले घराबाहेर
बुधवारी त्यांच्या घरी तुलसी विवाह होता. त्यासाठी मित्रमंडळी आणि शेजारीही आले होते. लग्न आटोपताच जेवण न करता निरोप घेऊन ते बाहेर पडले. एक दुचाकी घेऊन ते अचानकपणे घराबाहेर निघाले. मात्र, कुणालाच शंका आली नाही.
मोबाइलवर संदेश ...
एकाला मोबाइलवर संदेश आल्याने सर्वांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तातडीने पोलिसांत तक्रार देऊन शोधण्यासाठी वैनगंगा नदीच्या कारधा पुलावर सारे धावले.