भंडाऱ्यात शिव मंदिरातील मूर्तीची विटंबना ! आरोपीला अटक करा, संतप्त ग्रामस्थ धडकले पोलिस ठाण्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 18:22 IST2026-01-19T18:17:56+5:302026-01-19T18:22:41+5:30
१२ किलोमीटरचे अंतर कापत काढला आक्रोश मोर्चा : आरोपी न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

Desecration of idol in Shiva temple in Bhandara! Arrest the accused, angry villagers storm the police station
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : पवनी तालुक्यातील भावड येथील जागृत मंदिरातील मूर्तीची विटंबना केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस येताच भावड गावासह पंचक्रोशीतील भाविकांनी घटनास्थळी अलोट गर्दी केली होती. शनिवारी रास्ता रोको आंदोलनानंतर आरोपीला अटक करण्यासाठी पोलिस प्रशासनाला २४ तासांची मुदत दिल्यानंतर रविवारी १८ जानेवारीला सकाळी ११ भावड येथून शेकडो ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने अड्याळ पोलिस ठाण्यावर धडकले.
भावड ते कोंढा कोसरा मार्गे अड्याळ १२ किलोमीटरचे अंतर कापत जन आक्रोश मोर्चा अड्याळ पोलिस ठाण्याजवळ धडकला. यावेळी रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी प्रामुख्याने आमदार नरेंद्र भोंडेकर, मंदिराचे अध्यक्ष प्रमोद मेंढे, समिती पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य रेखा भुसारी, देवेंद्र हजारे, किशोर पंचभाई, रविकिरण भुसारी, भावड परिसरासह सामाजिक कार्यकर्ता, पदाधिकारी महिला ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आरोपीला न पकडल्यास जिल्हा मुख्यालयी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. मोर्चा अड्याळ येथे दाखल होताच गर्दी वाढली.
पोलिस ठाण्यासमोर येताच आंदोलकांनी घडलेल्या अप्रिय घटनेचे दुःख व आक्रोश व्यक्त केला. पोलिस प्रशासनाला २४ तासांची वेळ देऊनसुद्धा आरोपीला अटक करू शकले नाही, त्यामुळे आम्ही हा पवित्रा घेतला. या आधी दोनदा घटना अशाच घडल्या. त्यातही आरोपींचा शोध नाही. कुणाचीही भावना दुखावता कामा नये म्हणून आंदोलकांनी संयम ठेवा न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट मत आमदार भोंडेकर यांनी व्यक्त केले.
अप्पर अधीक्षकांसमोरच पोलिस प्रशासनाचा निषेध
अड्याळ पोलिस स्टेशन समोर आंदोलन धडकताच आंदोलकांनी काही काळ रस्ता अडवून धरून हर हर महादेवची घोषणा दिली. आरोपीला अटक झालीच पाहिजे नाही तर भावड ते भंडारा असा भाविकांचा मोर्चा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर आणू, असे सांगितले. त्यानंतर पोलिस स्टेशन अड्याळ कक्षात अप्पर पोलिस अधीक्षक नीलेश मोरे हे व आमदार भोंडेकरसह शिष्टमंडळ बैठक पार पडली. या घटनेमुळे गावातील तथा पंचक्रोशीतील समस्त भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. याप्रसंगी मंदिर अध्यक्षांना केलेल्या वक्तव्याचा अप्पर पोलिस अधीक्षकासमोर पोलिस प्रशासनाचा निषेध केला. आंदोलकांना धमकावण्यापेक्षा आरोपींचा शोध घ्यावा, असेही मत व्यक्त केले.