Coronavirus positive news; भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 18:31 IST2021-05-15T18:29:38+5:302021-05-15T18:31:19+5:30
Coronavirus in Bhandara एप्रिलच्या १२ तारखेला भंडारा जिल्ह्यात १५९६ उच्चांकी पाॅझिटिव्ह रुग्ण आले होते, तर शनिवारी जिल्ह्यात १७१ पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या वेगाने कमी होत असून मृत्यूचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसत आहे.

Coronavirus positive news; भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने घट
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : एप्रिल महिन्यातील कोरोना संसर्गाच्या उद्रेकाने भयभीत झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांना मे महिन्यात मोठा दिलासा मिळत आहे. १ मे पासून रुग्णांची संख्या सातत्याने घटत असल्याचे दिसत आहे. एप्रिलच्या १२ तारखेला १५९६ उच्चांकी पाॅझिटिव्ह रुग्ण आले होते, तर शनिवारी जिल्ह्यात १७१ पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या वेगाने कमी होत असून मृत्यूचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसत आहे.
भंडारा जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हाहाकार उडाला होता. एप्रिल महिन्यात सर्वाधिक ३३ हजार रुग्णांची नोंद करण्यात आली होती, तर आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी अर्धे अधिक मृत्यू एप्रिल महिन्यातच झाले होते. रुग्णालयात खाटा अपुऱ्या पडू लागल्या होत्या. ऑक्सिजनही मिळत नव्हते. अशा स्थितीत मे महिना उजाडला आणि रुग्णांची संख्या वेगाने कमी व्हायला लागली.
शनिवारी जिल्ह्यात ७ जणांचा मृत्यू
जिल्ह्यात शनिवारी १२३५ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात १७१ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. भंडारा तालुक्यात ५०, मोहाडी ६, तुमसर ८, पवनी ३, लाखनी ५१, साकोली ३८ आणि लाखांदुरमध्ये १५ रुग्णांचा समावेश आहे. शनिवारी ७ जणांचा मृत्यू झाला असून त्यात भंडारा तालुक्यातील ४ व्यक्ती आहेत. तुमसर तालुक्यातील २ आणि साकोली तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार १७६ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली होती. त्यापैकी ५२ हजार ७४५ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत.
ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३४३५
जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १३ हजारापर्यंत गत महिन्यात पोहोचली होती. आता ती ३४३५ पर्यंत आली आहे. तालुकानिहाय ॲक्टिव्ह रुग्ण पुढीलप्रमाणे. भंडारा ९५१, मोहाडी १४५, तुमसर ३१९, पवनी २३३, लाखनी ४८९, साकोली ११३७, लाखांदूर १४१ व्यक्तींचा समावेश आहे.