सालेबर्डी पुलाखाली आढळला तरुणाचा मृतदेह, प्रेमप्रकरणातून खुनाचा संशय; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 19:58 IST2023-11-30T19:58:01+5:302023-11-30T19:58:15+5:30
या प्रकरणाची माहिती सरपंचांनी जवाहरनगर पोलिसांना दिली.

सालेबर्डी पुलाखाली आढळला तरुणाचा मृतदेह, प्रेमप्रकरणातून खुनाचा संशय; गुन्हा दाखल
देवानंद नंदेश्वर
भंडारा : जवाहरनगर पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या सालेबर्डी शिवारातील पुलाखाली एका १९ वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. ही घटना गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
नयन मुकेश खोडपे (१९) रा. भंडारा, असे मृत तरुणाचे नाव आहे. नयन हा सोमवारपासून घरून गायब झाला होता. कुटूंबियांनी त्याची शोधाशोध केली असता मिळून न आल्याने मंगळवारी वरठी पोलिस ठाणे गाठून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान सालेबर्डीच्या सरपंचांना गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास कवडशी- सालेबर्डी दरम्यान असलेल्या पुलाच्या खाली असलेल्या पाण्यात तरुणाचा मृतदेह हातपाय बांधलेल्या स्थितीत आढळून आला. या प्रकरणाची माहिती सरपंचांनी जवाहरनगर पोलिसांना दिली.
जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. प्रेमप्रकरणातून खुनाचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्याच्या मागे आई, वडील, एक भाऊ, आजी असा आप्तपरिवार आहे.