रेल्वे रूळावर आढळले दोन तरुणांचे मृतदेह; मोहाडी तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 10:57 IST2022-06-28T10:54:43+5:302022-06-28T10:57:00+5:30
कोका येथील रेल्वे गेटजवळ अप आणि डाऊन लाईनच्या मध्यभागी दोन तरुणांचे मृतदेह असल्याचे दिसून आले.

रेल्वे रूळावर आढळले दोन तरुणांचे मृतदेह; मोहाडी तालुक्यातील घटना
मोहाडी (भंडारा) : मुंबई-हावडा रेल्वेमार्गाच्या रुळावर दोन तरुणांचे मृतदेह आढळण्याची घटना मोहाडी तालुक्यातील कोका रेल्वे गेटजवळ रविवारी उघडकीस आली. दोघेही साकोली येथील असून धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
महेश भगवानदास गुप्ता (३३) व निशांत प्रकाश पळसकर (३५) दोघेही रा. साकोली, जि. भंडारा अशी मृतांची नावे आहेत. कोका येथील रेल्वे गेटजवळ अप आणि डाऊन लाईनच्या मध्यभागी दोन तरुणांचे मृतदेह असल्याचे रविवारी सकाळी दिसून आले. या घटनेची माहिती मोहाडी पोलीस ठाण्यात कोका रेल्वे स्टेशनचे उपअधीक्षक राहुल नागदेवे यांच्या सूचनेवरून रेल्वेचा मेट शत्रुघ्न बळीराम उताने यांनी दिली. त्यावरून माेहाडीचे पोलीस पथक कोका येथे पाेचले. मृतकांच्या अंगावरील कपड्यांची तपासणी केली असता त्यांची ओळख पटली.
महेश एका वाहनावर क्लिनर होता, तर निशांत हा इलेक्ट्रिशियन होता. हे दोघेही चार चार पाच दिवस कामानिमित्त बाहेर राहायचे. त्यामुळे घरच्यांना त्यांचा ठावठिकाणा माहीत नसायचा. दोघांना वडील नसून आईच आहे. त्यांच्याकडे रेल्वे तिकीट सापडले नाही. मात्र धावत्या रेल्वेतून पडून त्यांचा मृत्यू झाला असावा असा संशय पोलिसांना आहे. अधिक तपास मोहाडीचे ठाणेदार राहुल देशपांडे करीत आहेत.